राज्य संघटनांना बैठक बोलावण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 03:33 AM2016-01-08T03:33:56+5:302016-01-08T03:33:56+5:30
सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल करण्याची अहवालामध्ये सूचना केली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल करण्याची अहवालामध्ये सूचना केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने या महिन्यापूर्वी संलग्न राज्य संघटनांना आपापल्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची सूचना केली आहे.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी बोर्डाच्या सर्व संलग्न संघटनांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘माननीय सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे, याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच. आम्ही या अहवालाची एक प्रत प्राप्त केलेली आहे. ३१ जानेवारी २०१६पूर्वी आपापल्या कार्यकारिणीची बैठक बोलावावी आणि लोढा समितीच्या शिफारशींचा बोर्डावर कसा प्रभाव पडू शकतो, याबाबत चर्चा करावी.’’
बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी अधिकृत वेबसाईटवर लिंक केलेल्या असून, त्याचसोबत ठाकूर यांचे पत्रही प्रकाशित केलेले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने १३ जानेवारी रोजी आपल्या व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली आहे. (वृत्तसंस्था)