राज्य मानांकन कॅरम : मोहम्मद आणि ऐशा यांनी पटकावले जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 09:39 PM2019-11-20T21:39:24+5:302019-11-20T21:39:41+5:30
मोहम्मदने मुंबईच्याच रियाझ अकबर अलीला १५-१४, २३-२२ असे सरळ दोन सेटमध्ये नमवले.
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले येथे झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या मोहम्मद घुफ्रान आणि ऐशा खोकावाला यांनी पुरुष आणि महिला एकेरी गटाचे जेतेपद पटकावले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मोहम्मदने मुंबईच्याच रियाझ अकबर अलीला १५-१४, २३-२२ असे सरळ दोन सेटमध्ये नमवले. अंतिम सामना हा चांगलाच रंगतदार झाला. कारण दोन्ही सेटमध्ये मोहम्मदला रियाझने कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपला अनुभव पणाला लावला. पण पहिल्या सेटमध्ये अखेर मोहम्मदने बाजी मारली. दुसरा सेटही यावेळी चांगला चुरशीचा झाला. दुसऱ्या सेटमध्येही मोहम्मदने रियाझवर फक्त एका गुणाच्या फरकाने मात करत जेतेपदाला गवसणी घातली.
तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या अग्रमानांकित प्रशांत मोरेने संदीप देवरुखकरला १८-१२, २३-१४ अशी धूळ चारली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत मोहम्मदने प्रशांतवर ११-२०, २२-५, १७-९ असा, तर रियाझने संदीपवर २५-५, १६-२२, २५-४ असा विजय मिळवला.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत अनुभवी ऐशाने रत्नागिरीच्या किशोरवयीन आकांक्षा कदमचा २३-१५, ७-२०, २५-१७ असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यामुळे सलग दुसरी राज्य मानांकन स्पर्धा जिंकण्याचे आकांक्षाचे स्वप्न भंगले.
तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने वैभवी शेवाळेचा २५-६, २५-८ असा धुव्वा उडवला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतींमध्ये ऐशाने काजलवर ६-२३, २५-१४, २१-७ अशी, तर आकांक्षाने वैभवीवर १५-२०, २०-१६, २५-१७ अशी मात करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.