तरीही धोनीच सर्वश्रेष्ठ
By admin | Published: January 22, 2016 03:01 AM2016-01-22T03:01:12+5:302016-01-22T03:01:12+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर टीका होत असताना आॅस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकेल
सिडनी : आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर टीका होत असताना आॅस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकेल हसी याने मात्र त्याची पाठराखण केली आहे. सध्या धोनी खराब काळाचा सामना करीत आहे; मात्र तोच भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे हसी म्हणाला.
जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जाणारा धोनी सध्या कर्णधार व फलंदाज या दोन्ही पातळ्यांवर अपयशी होत आहे. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हसी म्हणाला, ‘सध्या धोनीच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निराशाजनक होत असली, तरी धोनीच भारताचा यशस्वी कर्णधार आहे. त्याने भारतासाठी दिलेले योगदान नाकारता येणार नाही. बिकट परिस्थितीतही चांगली कामगिरी करण्याची धोनीत क्षमता आहे. त्यामुळेच त्याची गणना सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये होते.’
प्रत्येकवेळी धोनीने शतक अथवा अर्धशतक फटकवावे, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. भारतीय संघात प्रतिभाशाली युवा खेळाडू आहेत. त्यांनी धोनीच्या अनुभवाचा फायदा घेऊन सामना कसा फिरवायचा, याची कला शिकली पाहिजे. खरे तर अशा वेळी धोनीवर टीका करण्याऐवजी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे हसी म्हणाला.