स्मिथ, धोनीसह ड्रेसिंग रूम शेअर करण्यास स्टोक्स उत्सुक
By admin | Published: February 22, 2017 01:23 AM2017-02-22T01:23:19+5:302017-02-22T01:23:19+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू ठरलेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या टी-२० स्पर्धेत
लंडन : इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू ठरलेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या टी-२० स्पर्धेत प्रथमच खेळताना स्टीव्हन स्मिथ व महेंद्रसिंह धोनी यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर करण्यास उत्सुक आहे. स्टोक्सला सोमवारी रायझिंग पुणे सुपरजायन्ट््स संघाने १४ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले.
स्टोक्सने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर चॅट करताना म्हटले, ‘‘मी एम. एस. धोनी व स्टीव्हन स्मिथ यांच्यासह खेळण्यास उत्सुक आहे. या दोघांसह ड्रेसिंग रूम शेअर करणे शानदार राहील. धोनी जगातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे, तर स्मिथ सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. स्मिथविरुद्ध खेळताना काही वेळा वातावरण तापले होते. त्यामुळे त्याच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहे. तो शानदार खेळाडू आहे.’’
अष्टपैलू स्टोक्ससाठी गेले वर्ष शानदार ठरले. भारत दौऱ्यात कसोटी, वन-डे व टी-२० मध्ये इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला असला तरी स्टोक्सची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. सुपरजायन्ट््सचे गृहमैदान पुणे असून तेथे खेळण्यासाठी स्टोक्स उत्सुक आहे. स्टोक्स म्हणाला, ‘‘पुणे माझ्या आवडत्या मैदानापैकी एक आहे. भारताविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका माझ्यासाठी चांगली ठरली. मी तेथे पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे.’’
इंग्लंडचा आणखी एक क्रिकेटपटू व टी-२० स्पेशालिस्ट तिमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १२ कोटी रुपयांना करारबद्ध केले.
इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार इयान मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने २ कोटी रुपयांना विकत घेतले.
भविष्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, अशी आशा असल्याचे स्टोक्स म्हणाला.
(वृत्तसंस्था)
मला कदाचित अखेरचा साखळी सामना खेळता येणार नाही. मी जास्तीत जास्त सामने खेळणार आहे. कदाचित पूर्ण सत्रही खेळेन. मी टी-२० सामने खेळण्याबाबत उत्सुक आहे. इंग्लंडचा खेळाडू असल्यामुळे आम्हाला अधिक टी-२० सामने खेळण्याची संधी मिळत नाही.
- बेन स्टोक्स