कर्णधार मॉर्गनकडून स्टोक्सची प्रशंसा
By admin | Published: June 12, 2017 12:57 AM2017-06-12T00:57:06+5:302017-06-12T00:57:06+5:30
कर्णधार इयॉन मॉर्गन याने बेन स्टोक्समधील गुणवत्तेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
बर्मिंगहॅम : कर्णधार इयॉन मॉर्गन याने बेन स्टोक्समधील गुणवत्तेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. इंग्लंडने या अष्टपैलू खेळाडूच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आणले.
इंग्लंड स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला आहे; परंतु शनिवारी एजबेस्टनमध्ये संघाने २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३५ धावांत ३ फलंदाज गमावले होते; परंतु स्टोक्सने नाबाद १0२ धावांची वनडेतील सर्वोत्तम खेळी केली आणि इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (८७) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १५९ धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्यांदा पावसाने अडथळा आणल्यानंतर इंग्लंडने ४0.२ षटकांत ४ बाद २४0 धावा केल्या होत्या आणि संघ डकवर्थ लुईस आधारावर ४0 धावांनी विजयी झाला. मॉर्गनने सामना पुन्हा सुरूहोण्याआधी स्टोकशी चर्चा केली होती. तो म्हणाला, ‘‘आम्हाला वाटले सकारात्मक खेळणेच सर्वोत्तम पर्याय आहे आणि हा पवित्रा योग्य ठरला आणि आम्ही अशाच प्रकारे खेळलो. त्यामुळे मी जे करतो तेच केले. निश्चितच बेन खूप आक्रमक आहे आणि आक्रमक होणे त्याच्यासाठी सोपे आहे. त्याच्यातील गुणवत्ता प्रशंसनीय आहे. तो नेहमी बॅट, चेंडू एवढेच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही प्रभावित करतो. अनेक खेळाडूत त्याच्यासारखी गुणवत्ता आहे; परंतु सर्व बाबी तुमच्यानुसार होत नाहीत तरीदेखील बेन हा शानदार खेळाडू आहे. तो चेंडूला जोराने मारतो आणि सध्या त्याला जबरदस्त सूर गवसला आहे.’’