राहूल त्रिपाठीचे वादळ

By admin | Published: May 4, 2017 12:48 AM2017-05-04T00:48:13+5:302017-05-04T07:39:34+5:30

यंदाच्या सत्रात लक्षवेधी ठरलेल्या राहुल त्रिपाठीने केलेल्या तडाखेबंद ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटने

The storm of Rahul Tripathi | राहूल त्रिपाठीचे वादळ

राहूल त्रिपाठीचे वादळ

Next

आॅनलाईन लोकमत
कोलकाता, दि. 4 -  दहा लाख रुपये किंमत असलेल्या राहूल त्रिपाठीच्या वादळात केकेआरचा संघ उडून गेला. राहूलच्या ९३ धावांच्या तुफानी खेळीने पुण्याने केकेआरवर विजय मिळवत गुणतक्त्यात तिसरे स्थान गाठले. होमग्राउंडवर फेव्हरेट मानल्या जाणाऱ्या केकेआरला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या सत्रात सुरूवातीला गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर असलेला पुणे संघ कधी कात टाकेल आणि प्लेआॅफच्या शर्यतीत येईल, असे फॅन्सलाही वाटले नव्हते. त्यातच खेळाडूंची कामगिरीही म्हणावी तशी होत नव्हती, त्यामुळे पुणे संघ स्पर्धेच्या सुरूवातीला फक्त स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ
होता. त्यांच्याकडे स्पर्धेत ते चमकदार कामगिरी करतील, या दृष्टीने कुणी पाहतही नव्हते. मात्र सनरायजर्सवरील दमदार विजयानंतर पुण्याने कात टाकली. संघ अडचणीत असताना प्रत्येक वेळी एक तरी खेळाडू संघासाठी धावून आला. आणि
संघाला विजय मिळवून दिला. या आधी अष्टपैलु बेन स्टोक्सने शतक साजरे करत विजय मिळवून दिला. आजही सलामीवीर राहूल त्रिपाठी याने पुणे संघाला एकहाती विजय मिळवून दिला. पहिल्या डावात पुणे संघाच्या गोलंदाजांनी अचुक कामगिरी करत केकेआरच्या फलंदाजांना रोखले. रॉबिन उथप्पा शिवाय खेळणाऱ्या केकेआरला गोलंदाजीवर वर्चस्व गाजवता आले नाही. मनीष पांडे,सुर्यकुमार यादव यांनी मोक्याच्या वेळी खेळी केली. मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पुणे संघाने याचा पूरेपूर फायदा घेतला. पुण्याचा सलामीवीर अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार स्मिथही परतला. सर्वच खेळाडू
एकापाठोपाठ एक बाद होत होते. मात्र सलामीवीर त्रिपाठीने तुफानी फटकेबाजी करत विजय खेचून आणला. केकेआरच्या गोलंदाजांना तो चांगलाच डोईजड झाला होता. राहूलने कुलदीप यादवला १३ व्या षटकात सलग तीन षटकार ठोकले.
पुणे संघाने पहिल्या ६ षटकांतच ७४ धावा कुटल्या. ही त्यांची या स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीसोबतच राहूल त्रिपाठी स्पर्धेच्या यासत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ९ सामन्यात ३५२ धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक षटकारांच्या यादीतही तो पाचव्या स्थानावर आहे. त्याने
आतापर्यंत १६ षटकार लगावले आहेत. पुणे संघाचा इम्रान ताहीर हा देखील पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या
स्थानावर पोहचला आहे. ताहीरने १० सामन्यात १७ बळी घेतले आहेत. पुणे संघाने या विजयासोबतच गुणतक्त्यात हैदराबादला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले. पुण्याचे १४ तर हैदराबादचे १३ गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरचेही १४ गुण आहेत. मात्र केकेआर सरस नेट रनरेटच्या आधारावर पुढे आहे.


महाराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना राहुल त्रिपाठीने
४१ डावांत ३ शतके व ६ अर्धशतके ठोकली आहेत. त्याने एकूण १२४५ धावा केल्या आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये राहुलने महाराष्ट्राकडून २१ डावांत ४२७ धावा केल्या आहेत. ५९ ही त्याची सर्वाेच्च धावसंख्या. त्याने एक अर्धशतकही ठोकले आहे. ४ वेळा तो नाबाद राहिला आहे.

रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळताना राहुलने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध ५९, मुंबई इंडियन्सविरुद्ध ४५, गुजरात लायन्स विरुद्ध ३३, आरसीबीविरुद्ध ३७ आणि आधीच्या केकेआरविरुद्धच्या सामन्यात
३८ धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक :
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ८ बाद १५५ धावा (मनीष पांडे ३७, कॉलिन डी ग्रँडहोम ३६, सूर्यकुमार यादव ३०*; वॉशिंग्टन सुंदर २/१८, जयदेव उनाडकट २/२८) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट : १९.२ षटकांत ६ बाद १५८ धावा (राहुल त्रिपाठी ९३; ख्रिस वोक्स ३/१८).

Web Title: The storm of Rahul Tripathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.