स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धा : अमितला सुवर्ण, मेरीकोम, सीमाला रौप्य; भारतीय खेळाडूंनी केली पदकांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:20 AM2018-02-26T00:20:02+5:302018-02-26T00:20:02+5:30
अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सोफिया : अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अमित (४९ किलो) याने गेल्या महिन्यात इंडिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याने मोरक्कोच्या सैद मोर्दाजी याला नमवताना सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
हरियाणाच्या या २३ वर्षीय मुष्ट्यिोद्ध्याने खराब सुरुवातीतून सावरण्यात यश मिळवले, तर उंचपुरा सैद चपळतेने भारतीय खेळाडूच्या बरोबरीने होता; परंतु अचूकतेत तो अपयशी ठरला.
रशियाच्या अन्ना इवानोव्हा हिच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने सीमा पुनिया हिलादेखील ८१ किलोपेक्षा जास्त वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २ रौप्य आणि ४ कास्यपदकांची कमाई केली. मीना कुमारी (५४ किलो), एल. सरिता देवी (६0 किलो), स्विटी बुरा (७५ किलो) आणि भाग्यवती काचरी (८१ किलो) यांनी कास्यपदके जिंकली.
पुरुष गटात मोहंमद हसमुद्दीन (५६ किलो) आणि सतीश कुमार (९१ पेक्षा जास्त) यांनी कास्यपदक जिंकले.
समीरने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद-
बासेल (स्वित्झर्लंड) : भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू समीर वर्मा याने जबरदस्त कामगिरी करीत जागतिक क्रमवारीतील दुसºया स्थानी असणाºया ओ जोर्गेनसन याचा पुरुषांच्या एकेरी फायनलमध्ये पराभव करीत आज येथे स्विस ओपन सुपर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मध्यप्रदेशच्या २३ वर्षीय समीरने जबरदस्त कौशल्य सादर करीत जोर्गेन्सन याच्यावर एकतर्फी लढतीत २१-१५, २१-१३ अशी मात केली.
मेरी कोमचा बल्गेरियाच्या स्वेदाकडून पराभव-
महिला गटात मेरीकोम हिचे लक्ष आशियाई चॅम्पियनशिप आणि इंडिया ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर येथेही अव्वल स्थान मिळवण्याकडे लागले होते; परंतु तिला बल्गेरियाच्या स्वेदा असेनोवाकडून पराभव पत्करावा लागला.