स्ट्रेंड्जा मुष्टीयुद्ध स्पर्धा : विकास कृष्ण ठरला सर्वोत्तम खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:30 AM2018-02-27T01:30:23+5:302018-02-27T01:30:23+5:30
नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली.
नवी दिल्ली : नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली.
२६ वर्षीय विकासने मिडलवेट (७५ किलो) गटामध्ये सुवर्ण पदक जिंकताना अमेरिकेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य विजेता ट्राय इसले याला नमविले होते. विशेष म्हणजे, गतवर्षी एप्रिल - मे महिन्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावल्यानंतर विकासने पटकावलेले हे पहिले पदक ठरले. त्याचवेळी हाताच्या दुखापतीतून सावरुन पुनरागमन केलेला विकासला गेल्यावर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला वॉकओव्हर देण्याच्या कारणावरुन बेशिस्तपणाच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हे सुवर्ण पदक विकाससाठी खूप महत्त्वाचे आहे.
स्पर्धेत सर्वोत्तम ठरल्यानंतर विकासने वृत्तसंस्थेला म्हटले की, ‘हे खूप चांगले पुनरागमन ठरले व आता मी स्वत:ला खूप मजबूत मुष्टीयोद्धा मानतो. आपल्या वजनी गटाला एका निश्चित स्तरावर कायम राखण्यात आता मला पूर्वीप्रमाणे अडचण होत नाही. मी तंत्रामध्ये आणि शारीरिक क्षमतेत सुधारणा केली आहे.’
दुखापतीविषयी तोे म्हणाला की, ‘मला हाताच्या दुखापतीमुळे गेल्या काही काळापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता यातूनही मी सावरलो असून माझी पकड मजबूत झाली आहे. त्यामुळेच कामगिरीत सुधारणा होत आहे. काही स्पर्धांमध्ये मी पहिल्याच फेरीत पराभूत झालो होतो, पण आता ती समस्याही दूर झाली आहे.’ (वृत्तसंस्था)
या स्पर्धेत विकास व्यतिरिक्त अमित फंगल (४९ किलो) यानेही सुवर्ण पदक जिंकले. तसेच, भारताने स्पर्धेत एकूण ११ पदकांची लूट केली. यापैकी ५ पदक पुरुषांनी, तर ६ पदक महिला मुष्टीयोद्धांनी पटकावली. एकूण, भारतीय संघाने २ सुवर्ण पदकांसह ३ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर कब्जा केला.
खूप चांगले पुनरागमन झाले असून आता मी स्वत:ला मजबूत मुष्टीयोद्धा मानतो. आपल्या वजनी गटाला एका निश्चित स्तरावर कायम राखण्यात आता मला पूर्वीप्रमाणे अडचण होत नाही.