ब्लॉक बस्टर्सची दमदार आगेकूच
By admin | Published: June 21, 2015 12:59 AM2015-06-21T00:59:35+5:302015-06-21T00:59:35+5:30
ब्लॉक बस्टर्स आणि कूल स्मॅशर्स या संघांनी चमकदार कामगिरी करताना पहिल्यावहिल्या मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
मुंबई : ब्लॉक बस्टर्स आणि कूल स्मॅशर्स या संघांनी चमकदार कामगिरी करताना पहिल्यावहिल्या मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खार जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ब्लॉक बस्टर्स संघाने ‘अ’ गटामध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. सुप्रीम फायटर्सविरुद्ध झालेल्या लढतीत ०-२ असे पिछाडीवर पडल्यानंतर ब्लॉक बस्टर्स संघाने फिनिक्स भरारी घेताना झुंजार विजय मिळवला आणि सर्वाधिक ११० गुणांची कमाई करून गटात अव्वल स्थान पटकावले. पहिल्या दोन लढतींत पराभूत झालेल्या ब्लॉक बस्टर्स संघाने निशांत कुलकर्णी आणि श्वेता पार्टे यांनी मिश्र दुहेरीमध्ये बलाढ्य रवींद्र कोटीयन आणि द्युती पत्की यांचा पराभव करून ब्लॉक बस्टर्ससाठी निर्णायक कामगिरी केली.
त्याचवेळी तत्पूर्वी झालेल्या ‘एस’ संघाविरुद्धदेखील निशांतने धक्कादायक निकाल लावताना बालढ्य शुभम आंब्रेला पाच सेटच्या लढतीत नमवले होते. त्याचवेळी श्वेता पार्टेला मात्र अनुभवी आश्लेषा त्रहान विरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.
दुसऱ्या बाजूला याच गटातून कूल स्मॅशर्स संघानेदेखील चमक दाखवताना पहिल्या सामन्यात सुप्रीम फायटर्स संघाला नमवले. यानंतर पुढच्याच सामन्यात एस संघाला धक्का देऊन त्यांनी १०० गुणांची कमाई करून गटात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताचा चौथ्या क्रमांकाचा बलाढ्य सनील शेट्टीने एस विरुद्ध आपल्या तिन्ही लढतींत बाजी मारताना कूल स्मॅशर्सच्या विजयात मोलाचे योगदान दिले.