डोपिंग प्रकरणात सुब्रत पॉल निलंबित

By admin | Published: April 26, 2017 01:12 AM2017-04-26T01:12:48+5:302017-04-26T01:12:48+5:30

सुप्रसिद्ध भारतीय गोलरक्षक सुब्रत पॉल डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Subrata Paul suspended in the doping case | डोपिंग प्रकरणात सुब्रत पॉल निलंबित

डोपिंग प्रकरणात सुब्रत पॉल निलंबित

Next

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भारतीय गोलरक्षक सुब्रत पॉल डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. फुटबॉलपटू सुब्रतने निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी ‘बी’ सॅम्पलची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशाल दास यांनी सांगितले, ‘‘अर्जुन पुरस्कारविजेता पॉल गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेदरम्यान डोपिंगमध्ये दोषी आढळला. यासाठी पॉलला चार वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. सुब्रतच्या ‘अ’ नमुन्यामध्ये बंदी असलेला पदार्थ आढळला आहे. हा पदार्थ टर्बुटेलाईन आहे. नाडाने एआयएफएफला पाठविलेल्या पत्रानुसार सुब्रतवर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.’’
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर टर्बुटेलाईनचा वापर होतो. अस्थमासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधामध्ये याचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे खोकला व सर्दीसाठी देण्यात येणाऱ्या साधारण औषधांमध्येही हा पदार्थ असतो. पण एखाद्या खेळाडूला अस्थमासंंबंधित औषध घ्यायचे असल्यास त्याला टीयूई (उपचारासाठी विशेष सूट) प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो.
वाडाने टर्बुटेलाईनला ‘बीटा-२ एगोनिस्ट््स’ गटात ठेवले आहे. या गटातील औषधांचा कुठल्याही स्थितीत स्पर्धेदरम्यान किंवा अन्य वेळी उपयोग करता येत नाही.
पॉल याला आता त्याचा संघ डीएसके शिवाजीयन्सतर्फे ३० एप्रिल रोजी मिनर्व्हा पंजाबविरुद्ध आयलीग सामना खेळता येईल का, असे दास यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘त्याला ‘बी’ सॅम्पलची चाचणी आाणि त्यासोबत अस्थायी निलंबन रद्द करण्याचे अपील करता येईल. अस्थायी निलंबन रद्द करण्याचे अपील केल्यानंतर त्याला खेळता येईल. पण वाडाच्या समितीने त्याच्या अपिलाविरुद्ध निर्णय दिला आणि नाडाने आम्हाला त्याचा ‘अ’ नमुना सदोष असल्याची माहिती दिल्यानंतर तो ज्या सामन्यात खेळेल त्या लढतीत त्याच्या संघाला पराभूत मानले जाईल.’’
वाडाच्या नियमानुसार राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीला (नाडा) डोप चाचणीबाबत खेळाडू व महासंघाला सूचना द्यावी लागते. खेळाडूला ‘बी’ सॅम्पलची चाचणी घेण्याची विनंती करण्याचा अधिकार असतो. ‘बी’ सॅम्पलची चाचणी प्रलंबित असेपर्यंत खेळाडू अस्थायी स्वरूपात निलंबित राहील. वाडाच्या नव्या नियमानुसार प्रथमच डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूवर जास्तीत जास्त चार वर्षांची बंदी घालण्यात येते.
३० वर्षीय पॉलने म्हटले, ‘मी निर्दोष असून ‘बी’ सॅम्पलची चाचणी करणार आहे. डोप चाचणीत दोषी आढळल्याच्या वृत्तामुळे मला धक्का बसला. मला नाडा किंवा एआयएफएफकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मला प्रसारमाध्यमांकडून याबाबत कळले. मी १० वर्षांच्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे व समर्पणाच्या भावनेने खेळलो. मी निर्दोष असल्याचे सिद्ध करणार आहे. मी ‘बी’ सॅम्पलची चाचणी घेण्याची विनंती करणार आहे. डोप चाचणीत दोषी आढळेल, असे कुठलेही कृत्य मी केलेले नाही. मुंबईच्या राष्ट्रीय शिबिरात सर्वच खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. मी दोषी आढळेल, असे मला कधीच वाटले नाही.’ पॉलने भारतातर्फे २००७ मध्ये पदार्पण केले. २०१५ पर्यंत त्याने ६४ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Subrata Paul suspended in the doping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.