सुधा सिंगला सुवर्णपदक
By admin | Published: July 9, 2017 02:57 AM2017-07-09T02:57:59+5:302017-07-09T02:57:59+5:30
येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने
भुवनेश्वर : येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुधाने ९ मिनिट ५९.४७ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.
सुधाने २00९, २0११ आणि २0१३ च्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानले होते. परंतु यंदाच्या स्पर्धेत नुकतीच विवाहबध्द झालेल्या महाराष्ट्र कन्या ललिता बाबरने माघार घेतल्याने तिला सुवर्णपदकाची संधी होती. याशिवाय बहारिनची विश्व आणि आशियाई विक्रमवीर रुथ जेबेट हीचे आव्हानही या स्पर्धेत नसल्याने सुधाचा सुवर्णपदकाचा मार्ग सोपा झाला होता.
३१ वर्षीय सुधाने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. सर्वांसोबत काही वेळ पळाल्यानंतर सुधा पाच स्पर्धकांसह शर्यतीत पुढे होती. शर्यत निम्म्यावर आल्यानंतर सुधाने आपला वेग वाढवत सर्वांना मागे टाकले आणि निर्णायक आघाडी घेतली. सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर तिने मैदानाला फेरी मारुन प्रेक्षकांना अभिवादन केले. उत्तर कोरियाची १८ वर्षीय हयो गयोंग १0 मिनिट १३.९४ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदकावर कब्जा केला. १0 मिनिटे १८.११ सेकंदाची वेळ नोंदवणाऱ्या जपानच्या नाना सातो हिला कांस्यपदक मिळाले.(वृत्तसंस्था)
रिओ आॅलिम्पिकनंतर ही माझी पहिली मोठी स्पर्धा होती. मला स्वाईन फ्ल्यू झाल्यानंतर ५ महिने माझा सराव बंद होता. त्यामुळे आजचे पदक महत्त्वाचे आहे. आज नोंदवलेली वेळ थोडी जास्त असली तरी येथील परिस्थिती थोडी प्रतिकूल होती. या विजयाने वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी पात्रता मिळाल्याने मी जास्त खूष आहे.
- सुधा सिंग.
पुरुषांच्या १00 मी. धावण्याच्या स्पर्धेत वादावादी
येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या
१00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत खराब सुरवातीवरुन वादावादी झाली. या स्पर्धेत मलेशियाच्या खेरुल हाफिज या खेळाडूला अपात्र ठरवण्यात आले होेते. हाफीजने शर्यत पुन्हा घेण्याची मागणी केली परंतु ती फेटाळून लावण्यात आली.
मैदानावर उपस्थित तांत्रिक समितीने धावपटूंच्या सुरवातीचे प्रिंटआउट पाहिल्यानंतर कतारच्या तोसिन जोसेफ ओनुगोडे याला अपात्र ठरवले. चीनच्या टँग शिगकियांग यालाही खराब सुरवातीच्या कारणावरुन अपात्र ठरवण्यात आले.