सुदीरमन कप बॅडमिंटन; भारताची लढत कोरियासोबत
By admin | Published: May 13, 2015 01:22 AM2015-05-13T01:22:10+5:302015-05-13T01:22:10+5:30
सायना नेहवाल व के. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटन संघाला बुधवारी सुदीरमन कप स्पर्धेत ‘ग्रुप वन डी’च्या महत्त्वाच्या लढतीत
डोंगुआन : सायना नेहवाल व के. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटन संघाला बुधवारी सुदीरमन कप स्पर्धेत ‘ग्रुप वन डी’च्या महत्त्वाच्या लढतीत तीन वेळच्या चॅम्पियन कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
भारताला सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत मलेशियाविरुद्ध ३-२ नी पराभव स्वीकारावा लागला. भारताला बुधवारच्या लढतीत विजय मिळविणे आवश्यक आहे. या लढतीत पराभव स्वीकारावा लागला, तर भारताचे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याचे स्वप्न भंगणार आहे. भारतीय संघासाठी या लढतीत विजय मिळविणे सोपे नाही. कारण, कोरिया संघात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील वान हो सोन व महिला विभागात सातव्या क्रमांकावर असलेली सुंग जि ह्यून यांचा समावेश आहे. श्रीकांत व सायना यांनी एकेरीच्या लढतीत विजय मिळविला, तर ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकविजेती जोडी अश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा यांच्यापुढे महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेली जोडी शिन सियुंग चान व ली सो ही यांचा पराभव करण्याचे आव्हान असेल. पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला संघ ली योंग दाय व यू सियोंग आणि आठवे मानांकनप्राप्त सुंग ह्यून व किम हा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
एकेरीच्या लढती चुरशीच्या होतील. श्रीकांतने दोनदा वानविरुद्ध सरशी साधली आहे; पण गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्याला सोमवारी ली चोंग वेईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. महिला एकेरीत आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाची ह्युनविरुद्धची कामगिरी ५-१ अशी आहे. सोमवारी सायनाला जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानावर असलेल्या ती जिंग यीविरुद्धच्या लढतीत घाम गाळावा लागला होता. (वृत्तसंस्था)