सुजल पिळणकर ठरला ‘मुंबई श्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:36 AM2018-02-20T04:36:36+5:302018-02-20T04:36:41+5:30
अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत आपल्या पीळदार शरीरयष्टीने तब्बल ५ हजार उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या परब फिटनेसच्या सुजल पिळणकर याने ‘मुंबई श्री’ किताब पटकावला.
मुंबई : अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत आपल्या पीळदार शरीरयष्टीने तब्बल ५ हजार उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या परब फिटनेसच्या सुजल पिळणकर याने ‘मुंबई श्री’ किताब पटकावला. त्याचवेळी फिजीक्स फिटनेस गटामध्ये प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.
बृहन्मुंबई बॉडिबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडिबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने कांदिवली येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल मैदानात झालेल्या या स्पर्धेत मुंबईकरांनी पीळदार शरीरयष्टीचा थरार अनुभवण्यास मिळाली. एकूण ९ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत सुजलने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर. एम. भटच्या
सुशांत रांजणकर यांचा पाडाव
केला.
८५ किलो वजनीगटात विजेता ठरल्यानंतर सुजलपुढे ९० किलो वजनगीगट विजेत्या सकिंदर आणि ९० किलोहून अधिक गटाचा विजेता श्रीदिप गावड यांचे मुख्य आव्हान होते. परंतु, कोणतेही दडपण न घेता सुजलने आपले उत्कृष्ट प्रदर्शन सादर करताना परिक्षकांचे लक्ष वेधले. याशिवया संदेश सकपाळ (५५ किलो), विनायक गोळेकर (६०), प्रतिक पांचाळ (६५), विघ्नेश पंडित (७०), सुशील मुरकर (७५ किलो), सुशांत रांजणकर (८० किलो), सकिंदर सिंग (९०) आणि श्रीदिप गावडे (९०हून अधिक) यांनी आपआपल्या वजनी गटात जेतेपद पटकावले.
त्याचवेळी, पुरुषांच्या फिटनेस फिजीक्स प्रकारात १७० सेमी उंची गटामध्ये परब फिटनेसच्या प्रथमेश बागायतदार याने वर्चस्व राखले. तसेच, १७० सेमी हून अधिक उंचीच्या गटामध्ये आरके फिटनेसच्या रोहन कदम याने बाजी मारली.
मला पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचवायचे असून मुंबई श्री जेतेपद त्यादृष्टीने टाकलेले पहिले दमदार पाऊल आहे. इथपर्यंत मी अत्यंत खडतर प्रवास केला आहे. यंदा सलग सहा स्पर्धा जिंकल्याने मी फॉर्ममध्ये होतो. या पुरस्कारांच्या जोरावरच मी मुंबई श्री किताब पटकावू शकलो. आता मला महाराष्ट्र श्री आणि भारत श्री या स्पर्धांमध्ये चमक दाखवायची आहे. पण, माझ्या खेळात पैशांचे सोंग घेता येत नाही, त्यामुळे जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी स्वत:ला न्याय देऊ शकत नाही.
- सुजल पिळणकर, मुंबई श्री विजेता.