सुखमनी टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र होऊ शकतो - अभिजित दळवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 11:26 PM2017-10-09T23:26:33+5:302017-10-09T23:26:46+5:30
राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
शिवाजी गोरे
पुणे : राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच्याबरोबर जेम्सन सिंग व अतुल वर्मा हे होते. त्याने महाराष्ट्राला या स्पर्धेत पहिले रौप्यपदक जिंकून दिले असल्याचे सहमार्गदर्शक नेवासा (अहमदनगर) येथील अभिजित दळवी यांनी ‘लोकमत’ला राजोरियो येथून सांगितले.
दळवी म्हणाले, की स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जेव्हा मी आणि संघाचे मुख्य मार्गदर्शक मीम बहादूर संघातील खेळाडूंबरोबर चर्चा करीत होतो, त्या वेळी अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीत सराव करीत असलेल्या सुखमनीच्या डोळ्यांमध्ये आम्ही एक वेगळाच आत्मविश्वास पाहिला. गेली १५ वर्षे राज्य आर्चरी संघटनेचा मार्गदर्शक म्हणून काम पाहताना जेव्हा जेव्हा सुखमनीला मी मैदानावर लक्ष्य साधताना पाहिले, तेव्हा एवढा आत्मविश्वास कधीच पाहिला नाही. ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात आपले लक्ष्य साधताना तो आज वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याच्याकडून लक्ष्य चुकले तरी तो गालातल्या गालात हसून आमच्याकडे पाहत होता. वैयक्तिक प्रकारातही तो टॉप ८ मधून बाहेर पडला आहे. कोरियाविरुद्धच्या खेळाडूबरोबर तो एक स्पर्धा जिंकला असता तर तो वैयक्तिकमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला असता. पात्रता फेरीमध्येसुद्धा नेत्रदीपक कामगिरी केली होती. तो सध्या त्याच्या गटात महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून मानला जातो. महासंघालासुद्धा त्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. आता भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता आमचे परतीचे विमान आहे. भारतात पोहोचल्यानंतर आम्ही सर्व हरियाणामध्ये रोहतक येथील किंवा झारखंडमध्ये जमशेटपूरमधील टाटा आर्चरी अॅकॅडमीमध्ये भारतीय संघाचे शिबिर २०१८मध्ये जकार्ता येथे होणाºया आशियाई स्पर्धेच्या दृष्टीने लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे सुखमनीसुद्धा तेथेच राहणार आहे. परदेशी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण एकदा सुरू झाले की, त्याच्या कामगिरीत अजून खूप सुधारणा होईल.
आमच्याबरोबर किशोरी गटात दौंडची (जि. पुणे) साक्षी शितोळेसुद्धा भारतीय संघात होती. तिचीसुद्धा कामगिरी नेत्रदीपक झाली; पण तिला पदक जिंकण्यात अपयश आले. सुखमनीला २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीनेसुद्धा सराव शिबिरात दाखल करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. जर त्याची त्या शिबिरासाठी निवड झाली तर तो टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा नक्कीच फडकावेल. - अभिजित दळवी, सहमार्गदर्शक