सरिताने देशाची लाज घालवली : मिल्खासिंग
By admin | Published: January 17, 2015 02:58 AM2015-01-17T02:58:45+5:302015-01-17T02:58:45+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळवणाऱ्या भारतीय बॉक्सर सरिता देवी हिची महान अॅथलिट मिल्खासिंग यांनी मात्र निंदा केली
दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळवणाऱ्या भारतीय बॉक्सर सरिता देवी हिची महान अॅथलिट मिल्खासिंग यांनी मात्र निंदा केली आहे. इंचियोनयेथे पदकाचा स्वीकार करण्यास नकार देत तिने देशाची लाज घालविली, असे खळबळजनक उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.
८६ वर्षीय मिल्खा सिंग म्हणाले, एखाद्या खेळाडूसाठी सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे देशाचा सन्मान. कोणत्याही परिस्थितीत देशाच्या प्रतिमेस धक्का पोहचता कामा नये, याची काळजी खेळाडूंनी घेतली पाहिजे. मात्र, सरिता देवीने याचा विचार केला नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत घोषित केल्यानंतर तिने कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता.
अशा वागणुकीमुळे तिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने एका वर्षाची बंदी घातली. ही बाब भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी चांगली नाही. मला वाटते, सरिताला पंचांचा निर्णय मान्य नव्हता आणि त्यावर तिने नाराजी व्यक्त केली. असे असले तरी तिने पदक नाकारणे योग्य नव्हते. पदक वितरण समारंभात तिने जे काही केले त्यामुळे देशाची मात्र लाज गेली. मला नाही वाटत की तिने अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय मंचावर विरोध करायला हवा होता.
सरितावर लादलेल्या बंदीच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पुढे आला तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. गुरुवारी तिने सचिनची भेट घेत त्याचे आभार मानले. त्यानंतर सचिनने क्रीडा मंत्रालयास ‘आयबी’कडे भक्कमपणे बाजू मांडण्यास सांगितले. मिल्खा सिंग यांनी अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ‘पद्मभूषण’ मागितल्याबद्दलही टीका केली.
(वृत्तसंस्था)