सुमितने जिंकले रौप्य

By admin | Published: May 15, 2017 01:29 AM2017-05-15T01:29:27+5:302017-05-15T01:29:27+5:30

भारताच्या सुमितने रविवारी येथे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अखेरच्या दिवशी पुरुषांच्या १२५ किलो वजन

Sumit won silver with silver | सुमितने जिंकले रौप्य

सुमितने जिंकले रौप्य

Next

नवी दिल्ली : भारताच्या सुमितने रविवारी येथे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अखेरच्या दिवशी पुरुषांच्या १२५ किलो वजन गटाच्या फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले. सुमितला फायनलमध्ये इराणच्या यादोल्लाह मोहम्मद काजेम मोहेबी याच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
अशा प्रकारे भारतीय पैलवानांनी या स्पर्धेत एक सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण दहा पदकांची लूट केली. ही कामगिरी आधीच्या स्पर्धेच्या तुलनेत चांगली आहे. तेव्हा भारताने ९ पदके जिंकली होती.
सुवर्णपदकाच्या लढतीत इराणच्या तुल्यबळ पैलवानासमोर सुमित विशेष आव्हान देऊ शकला नाही आणि त्याला २-६ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीलाच गुण गमावल्यानंतर भारतीय पैलवानाने मुसंडी मारत लवकरच २ गुण घेतले; परंतु त्यानंतर इराणी पैलवानाने भारतीय मल्लाला मुसंडी मारण्याची संधी मिळू दिली नाही. पहिल्या फेरीनंतर इराणी पैलवान ५-२ ने आघाडीवर होता आणि त्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीतही एक गुण मिळवला.
हेवीवेट पैलवान सुमितने फायनलपर्यंत सुरेख कामगिरी केली. त्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सहज विजय नोंदवले.
दिवसाच्या आपल्या पहिल्या लढतीत सुमितने जपानच्या ताइकी यामामोटो याचा ६-३ असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत त्याने ताजिकिस्तानच्या फारखोद अनाकुलोव काके याचा ७-२ असा पराभव करीत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. तथापि, आज अन्य भारतीय फ्रीस्टाईल पैलवानांसाठीदिवस चांगला ठरला नाही. त्यात हरफूल (६१ किलो), विनोद कुमार ओमप्रकाश (७० किलो) आणि सोमवीर (८६ किलो) हे पहिल्याच फेरीत गारद झाले.
जपानच्या रेई हिगुची याने हरफूल याला उपांत्यपूर्व फेरीत ७-६ असे पराभूत केले. या भारतीय पैलवानाने आपल्या क्वालिफिकेशन लढतीत श्रीलंकेच्या दिवोशान चार्ल्स फर्नांडोला ११-० असे नमवले होते. विनोद कुमार ओमप्रकाश पुरुषांच्या ७० किलो वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मोमोजिरो नाकामुराकडून पराभूत झाला. कोरियाच्या गुवानुक किम याने सोमवीरला ११-० अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sumit won silver with silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.