सुनील छेत्री प्रतिभावान खेळाडू...
By admin | Published: September 5, 2016 05:48 AM2016-09-05T05:48:26+5:302016-09-05T05:51:35+5:30
सुनील छेत्रीने स्वत:ला तंदुरुस्त राखण्यात यश मिळविले, तर तो नक्कीच पुढील चार ते पाच वर्षे उच्च स्तरावर फुटबॉल खेळू शकतो.
मुंबई : सुनील छेत्रीने स्वत:ला तंदुरुस्त राखण्यात यश मिळविले, तर तो नक्कीच पुढील चार ते पाच वर्षे उच्च स्तरावर फुटबॉल खेळू शकतो. सुनील भारतीय संघाचा चमत्कारिक खेळाडू आहे, अशा शब्दांत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाइन यांनी भारताच्या हुकमी स्ट्रायकरचे कौतुक केले.
शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यात प्यूर्टो रिको संघाला भारतीय संघाने ४-१ असे नमविले. या शानदार विजयामध्ये छेत्रीने निर्णायक कामगिरी केली. छेत्रीने सामन्यात एक गोल करताना अन्य दोन गोल साकारण्यामध्ये आपले योगदान दिले. सामना संपल्यानंतर कॉन्स्टेनटाइन म्हणाले की, ‘सुनील छेत्री एक चमत्कारिक खेळाडू आहे. तो शानदार आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो देशासाठी गोल करतोय. मी त्याला नेहमी, तुझी वेळ संपत आली आहे, असे सांगून चिडवतो. मात्र, तो असे होऊ देत नाही. छेत्रीमध्ये अजूनही चार-पाच वर्षांचे फुटबॉल शिल्लक आहे.’
फिफा रँकिंगमध्ये स्थान उंचाविण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात १५२ व्या स्थानी असलेल्या भारताने ११४ व्या स्थानावर असलेल्या प्यूर्टो रिकोला पराभवाचा धक्का दिला. छेत्रीबाबत पुढे बोलताना कॉन्स्टेनटाइन म्हणाले की, ‘इतकी वर्षे खेळतानाही त्याने स्वत:ला चांगल्या स्थितीमध्ये ठेवले आहे. संघातील प्रमुख खेळाडूंपैकी तो महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे,तोपर्यंत तो नक्कीच खेळत राहील.’ विशेष म्हणजे, प्यूर्टो रिकोविरुद्धच्या सामन्यात संघाचा नियमित कर्णधार असलेल्या छेत्रीने संघाची धुरा नॉर्वेमध्ये खेळणारा युवा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूकडे सोपविली होती.
‘छेत्रीच्या तुलनेच्या खेळाडूसाठी तुम्हाला जागा शोधावी लागते. माझ्या नजरेत त्याची जागा स्ट्रायकरच्या मागे आहे. अन्य लोकांना तो खेळाशी जोडून ठेवतो. गोलवर लक्ष केंद्रित करताना, अचूक पासवर भर देत असल्याने त्याचा खेळ शानदार असतो. वैयक्तिकरीत्या माझी इच्छा आहे की, त्याने स्ट्रायकरच्या मागे खेळावे,’ असेही कॉन्स्टेनटाइन यांनी सांगितले.
दरम्यान, सामन्याआधी जेमतेम २४ तासांपूर्वी भारतात आगमन झालेल्या प्यूर्टो रिको संघाचे प्रशिक्षक डेव्हिड गुलेमट यांनी या सामन्यातील आमची कामगिरी निराशाजनक होती असे सांगितले. गुलमेट म्हणाले की, ‘कधी कधी फिफा क्रमवारी आपल्याला भ्रमित करते. आम्ही वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम संघाची अपेक्षा केली होती. तसेच, त्यांना रोखण्याची योजनाही बनवली होती. मात्र, दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो.’ (वृत्तसंस्था)
>छेत्रीची मैदानावरील जागा नक्कीच ठरलेली नसते. काही सामन्यांत मी त्याला डाव्या किंवा उजव्या बाजूने खेळविण्यास उत्सुक असतो. मात्र, यावेळेला त्याला स्ट्रायकरच्या मागे खेळताना पाहण्यास इच्छुक आहे.
- स्टिफन कॉन्स्टेनटाइन