सुनील छेत्री अव्वल चारमध्ये
By Admin | Published: March 30, 2017 01:19 AM2017-03-30T01:19:16+5:302017-03-30T01:19:16+5:30
भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना थेट ख्रिस्तियानो रोनाल्डो
मुंबई : भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना थेट ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये देशासाठी सर्वाधिक गोल नोंदवणारा छेत्री जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे इंग्लंडचा स्टार खेळाडू वेन रुनीला पिछाडीवर टाकून छेत्रीने चौथे स्थान पटकावल्याने जागतिक फुटबॉलचे लक्ष भारताकडे वळले आहे.
नुकताच झालेल्या म्यानमारविरुध्दच्या सामन्यात छेत्रीने आपल्या कारकिर्दीतील ५३वा गोल झळकावला. यासह सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणारा तो चौथा खेळाडू ठरला असून पोर्तुगालचा रोनाल्डो, अर्जेंटिनाचा मेस्सी आणि अमेरिकेचा क्लिंट डेम्पसे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, स्टार खेळाडू वेन रुनीनेही आपल्या कारकिर्दीतील ५३ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. परंतु यासाठी त्याने ११९ सामने खेळले असून छेत्रीने हीच कामगिरी ९३ सामन्यांत केली. त्यामुळे छेत्रीने रुनीला मागे टाकत चौथे स्थान पटकावले.
(क्रीडा प्रतिनिधी)
नुकताच झालेल्या आशिया चषक पात्रता फेरीत म्यानमारविरुध्द भारताने निसटता विजय मिळवला. अखेरच्या मिनिटाला छेत्रीने केलेला निर्णायक गोल भारतासाठी ऐतिहासिक ठरला. विशेष म्हणजे तब्बल ६४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने म्यानमारमध्ये बाजी मारली.