सुनील नरेन अधिक धोकादायक ठरेल : गंभीर
By admin | Published: April 10, 2016 03:34 AM2016-04-10T03:34:32+5:302016-04-10T03:34:32+5:30
गोलंदाजी शैलीला क्लीनचीट मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आॅफ स्पिनर सुनील नरेन इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या पर्वांत अधिक धोकादायक गोलंदाज म्हणून पुढे येईल
कोलकाता : गोलंदाजी शैलीला क्लीनचीट मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आॅफ स्पिनर सुनील नरेन इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या पर्वांत अधिक धोकादायक गोलंदाज म्हणून पुढे येईल, असे मत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केले.
नरेनबाबत बोलताना गंभीर म्हणाला, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी नरेनचा आत्मविश्वास अधिक उंचावलेला राहील.’ गोलंदाजी शैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी नरेनला विश्व टी-२० स्पर्धेत विंडीज संघातून माघार घ्यावी लागली होती.
गंभीर म्हणाला, ‘नरेनने आपल्या गोलंदाजी शैलीवर मेहनत घेतली आहे. सर्व काही आता सुरळीत असून तो कुठलेही दडपण न बाळगता सामन्यात खेळू शकतो. त्याची गोलंदाजी शैली नेहमी संशयाच्या भोवऱ्यात होती. पण, यावेळी मात्र त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी बघायला मिळेल, असा मला विश्वास वाटतो.’
आयपीएलमध्ये ७४ बळी घेणाऱ्या त्रिनिदादच्या या खेळाडूने २०१२ व २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या पूर्वसंध्येला गंभीर म्हणाला, ‘चांगली सुरुवात करण्यास सर्वच उत्सुक आहेत. चांगली सुरुवात केली तर तुमच्यावरील दडपण बऱ्याच अंशी कमी होते, असा माझा अनुभव आहे. आम्ही चांगली सुरुवात करण्यात यशस्वी ठरू आणि या स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यात यश येईल, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)