सनरायजर्स लढणार प्ले आॅफसाठी
By admin | Published: May 13, 2017 03:02 AM2017-05-13T03:02:24+5:302017-05-13T15:31:04+5:30
आयपीएलच्या या सत्रात गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा प्ले आॅफमधील प्रवेश अखेरच्या सामन्यापर्यंत निश्चीत होऊ शकलेला नाही.
आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत
कानपूर, दि. 13 - आयपीएलच्या या सत्रात गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा प्ले आॅफमधील प्रवेश अखेरच्या सामन्यापर्यंत निश्चीत होऊ शकलेला नाही. आज दुपारी ४ वाजता कानपूरच्या ग्रीन पार्कवर सनरायजर्स या सत्रातील साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना गुजरात लायन्स विरोधात खेळणार आहे. या सामन्यातील विजयावर सनरायजर्सचे प्लेआॅफचा प्रवेश अवलंबून आहे. तर गुजरात या स्पर्धेत आधीच बाहेर पडला आहे.
कानपूरचे ग्रीन पार्क हे सुरेश रैनाचे होमग्राउंड आहे. या सत्रात गुजरातची सांघिक कामगिरी चांगली झालेली नसली तरी रैना, मॅक्युलम, इशान किशन, कार्तिक, फिंच यांनी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांच्या तोंडचे पाणी अनेकदा पळवले आहे. त्यांनी दोनशेच्या वर धावसंख्या देखील नेली आहे. हे वॉर्नर आणि कंपनीला विसरुन चालणार नाही. मात्र त्यांची गोलंदाजी तशी
फारशी मजबूत नाही. दिल्ली विरोधात त्यांनी २०८ आणि १९५ धावा केल्या होत्या मात्र या डोंगराएवढ्या धावसंख्येचा बचाव करणे गुजरातला दोन्ही वेळेस जमले नाही. दिल्लीच्या अनअनुभवी फलंदाजांनी दोन्ही वेळेस लायन्सची सहज शिकार केली.
वॉर्नर, धवन, युवराज हे फॉर्ममध्ये असल्याने सनरायजर्सच्या व्यवस्थापनाला फारसे चिंतेचे कारण नाही. या दोन्ही संघात या आधी झालेल्या सामन्यात गुजरातने हैदराबादला फक्त १३८ धावांचे आव्हान दिले होते. हे माफक आव्हान वॉर्नर आणि हेन्रीक्स यांनी सहज पूर्ण केले होते.
सनरायजर्सची गोलंदाजी आयपीएलच्या सर्व संघातील मजबूत गोलंदाजी मानली जाते. अनुभवी भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अफगाणचा युवा फिरकीपटू राशिद खान हे सनरायजर्सचे मुख्य अस्त्र आहे. बिपुल शर्माचा मारा देखील गुजरातला अडचणीत आणु शकतो. कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यात हैदराबाद पराभूत झाल्यास प्ले आॅफमधील त्यांचा प्रवेश अडचणीत येऊ शकतो. पंजाबने तुफानी कामगिरी करत पाचवे स्थान गाठले आहे. हैदराबादचे
आता १५ गुण आहेत आणि पंजाबचे १४ गुण आहेत. मात्र पंजाबने १४ मे रोजी पुण्यावर विजय मिळवला तर ते प्ले आॅफ गाठतील. आणि हैदराबाद बाहेर जाऊ शकेल. त्यामुळे हा सामना हैदराबादसाठी अटीतटीचा आहे.