आरसीबीपुढे सनरायजर्सचे आव्हान

By admin | Published: April 5, 2017 12:08 AM2017-04-05T00:08:34+5:302017-04-05T00:08:34+5:30

आयपीएलच्या दहाव्या पर्वात आज, बुधवारी सलामी लढतीत विद्यमान चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Sunrisers challenge for RCB | आरसीबीपुढे सनरायजर्सचे आव्हान

आरसीबीपुढे सनरायजर्सचे आव्हान

Next

हैदराबाद : आघाडीचे काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे चिंतेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात आज, बुधवारी सलामी लढतीत विद्यमान चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
कर्णधार विराट कोहली व स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स दुखापतग्रस्त असल्यामुळे सलामी लढतीत खेळू शकणार नाहीत. कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली आहे तर डिव्हिलियर्स पाठदुखीतून सावरत आहे. आरसीबी संघाला सलामीवीर के.एल. राहुलची उणीवही भासणार आहे. दुखापतीमुळे त्याला या सत्रात सहभागी होता येणार नाही. आरसीबीचा युवा फलंदाज सरफराज खान बेंगळुरूमध्ये सरावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. सरफराजही यंदाच्या मोसमाला मुकण्याची शक्यता आहे.
कोहली सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आरसीबी संघाने शेन वॉटसनची प्रभारी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
आरसीबी संघाची भिस्त आता ख्रिस गेलवर आहे. गेलला सूर गवसला तर प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येतो. भारताचा उदयोन्मुख फलंदाज केदार जाधवची जबाबदारी आता वाढली आहे. आॅस्ट्रेलियाचा टी-२० स्टार ट्रॅव्हिस हेड, भारतीय खेळाडू सचिन बेबी आणि मनदीप सिंग यांचे फलंदाजीतील महत्त्व वाढले आहे.
आयपीएल २०१७ च्या लिलावामध्ये मोठ्या रकमेला करारबद्ध करण्यात आलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टाइमल मिल्सच्या समावेशामुळे आरसीबीची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. फिरकीची बाजू यजुवेंद्र चहल सांभाळणार आहे. या व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा लेग स्पिनर सॅम्युअल बद्री, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी यांच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे.
सनरायजर्स हैदराबाद संघ गेल्या वर्षीच्या कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. हैदराबाद संघात आयपीएलच्या सर्वांत आक्रमक फलंदाजांपैकी एक कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. गेल्या वर्षी त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. वॉर्नरला अलीकडेच संपलेल्या भारत दौऱ्यात आॅस्ट्रेलियातर्फे चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण धरमशालामध्ये चौथ्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. हैदराबाद संघाला त्याच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. वॉर्नरच्या साथीने आघाडीच्या फळीत शिखर धवन जबाबदारी सांभाळणार आहे. धवन चमकदार कामगिरी करीत भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. धवनने अलीकडेच देवधर ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.
मधल्या फळीतील युवराजच्या उपस्थितीमुळे सनरायजर्स संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. संघात मोएजेस हेन्रिक्स, केन विलियम्सन, नमन ओझा, दीपक हुड्डा व विजय शंकर हे फलंदाजही आहेत.
सनरायजर्सने गोलंदाजीची बाजू मजबूत करण्यासाठी अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानचा संघात समावेश केला आहे. अष्टपैलू युवराज सिंग, हेन्रिक्स, बेन कटिंग, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन यांच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)
>सामन्याची वेळ : रात्री ८ पासून.
स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

Web Title: Sunrisers challenge for RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.