सनरायझर्सचा शानदार विजय
By admin | Published: May 9, 2017 12:31 AM2017-05-09T00:31:08+5:302017-05-09T00:35:29+5:30
गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवन (६२) आणि मोइसेस हेन्रीक्स (४४) यांच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने
हैदराबाद : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवन (६२) आणि मोइसेस हेन्रीक्स (४४) यांच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने शानदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल असलेल्या मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने धक्का दिला. पराभवानंतरही मुंबईने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, हैदराबादने प्ले आॅफसाठी मजबूत आगेकूच केली.
मुंबईला निर्धारित षटकांत ७ बाद १३८ धावांमध्ये रोखल्यानंतर हैदराबादने १८.२ षटकातंच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. शिखर धवनने ४६ चेंडंूत ४ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांची विजयी खेळी केली. त्याला चांगली साथ देताना हेन्रीक्सने ३५ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (६) स्वस्तात बाद करून मुंबईकरांनी सामन्यात रंग भरले. परंतु, यानंतर धवन-हेन्रीक्स यांनी ९१ धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकवला.
तत्पूर्वी, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली. दुसऱ्याच षटकात मोहम्मद नाबीने लेंडल सिमेन्सचा त्रिफळा उडवला, तर यानंतर सिद्धार्थ कौलने पार्थिव पटेल (२३), नितीश राणा (९) यांना झटपट बाद केल्याने मुंबईची सातव्या षटकात ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. या वेळी वरच्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने कर्णधार रोहित शर्मासह मुंबईची पडझड रोखण्यावर भर दिला. या दोघांनी जबाबदारीपूर्वक खेळताना मुंबईला समाधानकारक मजल मारून दिली. पांड्या २४ चेंडूत १५ धावांची संथ खेळी करून बाद झाला. परंतु, रोहितने कॅप्टन इनिंग करताना ४५ चेंडूंत ६
चौकार व २ षटकारांसह ६७ धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याची झुंज व्यर्थ गेली. सिद्धार्थ कौल (३/२४), भुवनेश्वर कुमार (२/२९) यांनी अचूक मारा केला. (वृत्तसंस्था)