सनरायझर्सचा रोमांचक विजय

By admin | Published: May 10, 2015 04:23 AM2015-05-10T04:23:27+5:302015-05-10T04:23:27+5:30

स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात ‘प्लेआॅफ’साठी शर्यत अतिशय चुरशीची झाली असून, आज हैदराबाद सनरायझर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ धावांनी हरवून पदकस्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात

Sunrise's exciting triumph | सनरायझर्सचा रोमांचक विजय

सनरायझर्सचा रोमांचक विजय

Next

रायपूर : स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात ‘प्लेआॅफ’साठी शर्यत अतिशय चुरशीची झाली असून, आज हैदराबाद सनरायझर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ धावांनी हरवून पदकतालिकेत १२ गुणांसह चौथे स्थान मिळविले. यामुळे मुंबई आणि बंगळुरूचा मार्ग अवघड बनला आहे.
धुवाधार खेळी करणारा डी कॉक (३१ चेंडूंत ५०) बाद झाल्यानंतर केदार जाधवचा अर्धशतकी (नाबाद ६३) तडाखा दिल्लीचा पराभव वाचवू शकला नाही. सनरायझर्सच्या विजयात नाबाद अर्धशतक झळकाविणारा हेन्रिक्स आणि २ बळी मिळवणारा कर्ण शर्मा हे दोघे ‘हिरो’ ठरले. सनरायझर्सने दिल्लीपुढे १६४ धावांचे आव्हान उभारले होते. प्रत्युत्तरात, दिल्ली संघाला २० षटकांत ४ बाद १५७ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला. त्यानंतर डी कॉकने धावांचा सपाटा लावला. त्याने अवघ्या २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याच्या ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अर्धशतक पूर्ण होताच कर्ण शर्माने सनरायझर्सचा मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर जेपी ड्युमिनी (१२), युवराजसिंग (२) हे झटपट बाद झाले. त्यामुळे दिल्ली संघ ४ बाद ६६ अशा स्थितीत सापडला. केदार जाधव आणि सौरभ तिवारी (नाबाद २६) यांनी शानदार प्रदर्शन करीत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले मात्र, अखेरच्या षटकांत १६ धावांची गरज असताना त्यांना ९ धावा करता आल्या.
त्याआधी, हेन्रिक्सच्या अवघ्या ४६ चेंडूंत नाबाद ७४ धावांच्या बळावर हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. इयॉन मोर्गनची २२ धावांची खेळीसुद्धा महत्त्वाची ठरली. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरचा हा निर्णय इतका यशस्वी ठरला नाही. कारण, दोन्ही सलमीवीर अवघ्या ३१ धावांत तंबूत परतले. शिखर धवनला झहीर खानने मोर्केलकरवी झेलबाद केले. त्याने १० चेंडूंत १३ धावा केल्या. वार्नरने सावध खेळ करून डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याचाही संयम सुटला. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात वॉर्नर तिवारीकरवी झेलबाद झाला. वॉर्नरने १५ चेंडूंत १ चौकार आणि एका षटकारच्या मदतीने १७ धावा केल्या. सलामीची जोडी परतल्यानंतर इयान मोर्गन आणि हेन्रिक्स या जोडीने डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३३ धावांची भागीदारी केली. मोर्गनला ११व्या षटकांत यादवने बाद केले. तो मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने हैदराबादच्या धावगतीला ‘ब्रेक’ लागला होता; पण दुसऱ्या बाजूने हेन्रिक्सची फटकेबाजी सुरूच होती. अखेर कर्ण शर्मा (१६) आणि रवी बोपारा (नाबाद १७) यांनी हेन्रिक्सला उत्कृष्ट साथ दिली. त्यामुळे हैदराबादला ४ बाद १६३ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून जयंत यादव आणि झहीर खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद
केला. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून कल्टर नीलने सर्वाधिक दोन बळी घेतले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Sunrise's exciting triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.