सुपर बुमराह
By admin | Published: April 30, 2017 02:48 AM2017-04-30T02:48:43+5:302017-04-30T03:38:19+5:30
गुजरात लायन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा अत्यंत चुरशीचा सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. मुंबईचा संघ सुपर ओव्हरही पूर्ण खेळू शकला नाही.
- आकाश नेवे / आॅनलाइन लोकमत
गुजरात लायन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा अत्यंत चुरशीचा सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. मुंबईचा संघ सुपर ओव्हरही पूर्ण खेळू शकला नाही. पुन्हा एकदा गुजरातला विजयासाठी माफक आव्हान मिळालेले, गुजरात संघाकडून बेफाम फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अॅरॉन फिंच आणि ब्रेंडन मॅक्क्युलम फलंदाजीसाठी आले. अशा दबावाच्या क्षणी मुंबईसाठी धावून आला तो जसप्रीत बुमराह.
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी त्याने योग्य निभावत मुंबईला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये मुंबईने किरॉन पोलार्डच्या दहा धावांमुळे गुजरातला १२ धावांचे लक्ष्य दिले. मात्र फटकेबाजी करताना पोलार्ड बाद झाला, तर जोश बटलरही एक धाव काढून पाचव्याच चेंडूवर बाद झाला. सुपर ओव्हरही मुंबईचा संघ पूर्ण खेळू शकला नाही, मोक्याच्या क्षणी आपल्या वेगवान गोलंदाजीचे अस्त्र बाहेर काढणाऱ्या रोहितने सुपर ओव्हरची जबाबदारी बुमराहला दिली. त्यातही पहिल्याच चेंडूवर पाय क्रीजच्या बाहेर पडल्याने नो बॉल गेला. नंतर आणखी एक बॉल वाईड होता. एकूण ८ चेंडू टाकूनही बुमराहने फिंच किंवा मॅक्क्युलमला एकही चौकार किंवा षटकार मारण्याची संधीच दिली नाही. अफलातून यॉर्करचा मारा करत आपल्याला यॉर्कर मॅन हे नाव किती सार्थ आहे, हे बुमराहने दाखवून दिले.
त्याआधी कृणाल पांड्याची गोलंदाजीही गुजरातला महागात पडली. पांड्याने ४ षटकांत १४ धावा देत तीन गडी बाद केले.
सामन्याची सुरुवातच युवा इशान किशनच्या फटकेबाजीने झाली. एका बाजूने झारखंडचा हा युवा खेळाडू अप्रतिम फटकेबाजी करत होता. तर दुसऱ्या बाजूने फिंच, मॅक्क्युलम, रैना, कार्तिक यासारखे धुरंधर एकापाठोपाठ एक तंबूत परतत होते. किशनची ही खेळी अनुभवी हरभजनसिंह ने संपुष्टात आणली.
मुंबईच्या डावाची सुरुवातही तशी दणक्यातच झाली. पार्थिव पटेलने तुफान फटकेबाजी करत ४४ चेंडूत ७० धावा केल्या, मात्र त्यालाही म्हणावी तशी साथ लाभली नाही.अखेरच्या षटकांत अवाक्यात असलेले लक्ष्य पूर्ण करताना मुंबईची दमछाक झाली. अखेरच्या चेंडूवर धाव घेताना पांड्या बाद झाला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला गेला.
मुंबई संघाने या विजयासह गुण तक्त्यात दुसरे स्थान राखले आहे. मुंबई आणि अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता संघाचे गुण सारखे असले तरी कोलकाता संघ नेट रनरेटने सरस आहे.