सुपर जायंट्सची लढत पंजाबविरुद्ध
By admin | Published: April 8, 2017 12:51 AM2017-04-08T00:51:23+5:302017-04-08T00:51:23+5:30
किंग्स इलेव्हन पंजाबची आयपीएल दहामधील सलामी स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध होत आहे.
इंदूर : नवा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करण्यास सज्ज असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबची आयपीएल दहामधील सलामी स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध होत आहे.
स्मिथच्या नाबाद ८४ धावा, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि लेग स्पिनर इम्रान ताहिरच्या भेदक माऱ्यामुळे पुण्याने गुरुवारी अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला सात गड्यांनी धक्का दिला. पुण्याचा संघ संतुलित वाटतो. विजयी वाटचाल कायम राखण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. दुसरीकडे किंग्स पंजाबनेदेखील यंदा अप्रतिम कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे. मुरली विजय जखमांमुळे बाहेर असला तरी मॅक्सवेलला इयोन मोर्गन, डेरेन सॅमी आणि हाशिम अमला, शॉन मार्श, मार्टिन गुप्तिल, मोर्गन आणि डेव्हिड मिलर अशी सरस साथ लाभणार आहे.
संदीप शर्मा, मोहित शर्मा, इशांत शर्मा, वरुण अॅरोन आणि मॅट हेन्री यांचा अनुभवी मारा आणि सोबतीला नव्या दमाचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन हे पंजाबच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील. फिरकीची भिस्त अक्षर पटेलवर असेल.
सुपरजायंट्स संघ मुंबईविरुद्ध खेळलेल्या संघात एक बदल करू शकतो. अशोक डिंडाने भरपूर धावा मोजल्या होत्या. त्याचे स्थान शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, ईश्वर पांडे यांच्यापैकी एकाला मिळेल. वेगवान माऱ्यासाठी बेन स्टोक्स फिट असला तरी चेंडूवर नियंत्रण राखण्याची जबाबदारी त्याला स्वीकारावीच लागेल. फलंदाजीत स्मिथ आणि रहाणे, स्टोक्स आणि धोनी यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. (वृत्तसंस्था)
>१६०० हून अधिक पोलिस
इंदूर : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायजिंग पुणे यांच्यात उद्या होणाऱ्या आयपीएल सामन्यासाठी होळकर मैदानावर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांच्या अनुसार ‘आयपीएल सामन्यासाठी होळकर स्टेडियममध्ये १६०० हून अधिक पोलिस तैनात असतील. यामध्ये आठ आयपीएस दर्जाचे अधिकारी असणार आहेत.’ २६,००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या या मैदानात ७० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. मिश्रा यांच्या अनुसार टी-२० सामन्यापूर्वी तिकिटांचा काळाबाजार आणि नफेखोरीचे काही प्रकार समोर आल्यानंतर पोलिस यावर नजर राखून आहेत. किंग्ज इलेव्हन, पंजाबने इंदूरच्या होळकर स्टेडियमला आपले गृहमैदान बनविले आहे. हा संघ ८, १० आणि २० एप्रिलला तीन आयपीएल सामने खेळेल. रायजिंग पुणे सुपरजायंट, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध हे सामने असतील.