‘सुपर’ सायना !
By admin | Published: March 30, 2015 05:00 AM2015-03-30T05:00:14+5:302015-03-30T05:00:14+5:30
विश्वात पहिल्या क्रमांकाची बॅटमिंटनपटू होण्याचा मान मिळवल्यानंतर सायना नेहवालने रविवारी इतिहास रचला. तिने देशातील प्रतिष्ठेच्या इंडिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. ही स्पर्धा
Next
>नवी दिल्ली : विश्वात पहिल्या क्रमांकाची बॅटमिंटनपटू होण्याचा मान मिळवल्यानंतर सायना नेहवालने रविवारी इतिहास रचला. तिने देशातील प्रतिष्ठेच्या इंडिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. ही स्पर्धा तिने प्रथमच जिंकली. सायनाने अंतिम सामन्यात थायलंडच्या माजी विश्व चॅम्पियन रतचानोक इतानोनचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाने एका चॅम्पियनप्रमाणेच प्रदर्शन केले. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या सायनाने इतानोनचा २१-१६, २१-१४ने फडशा पाडला. यापूर्वी इतानोनविरुद्ध तिची कामगिरी ५-३ अशी होती. आज तिच्यापुढे प्रतिस्पर्धी खेळाडूचे इतके मोठे आव्हान असल्याचे दिसत नव्हते. तिने आपल्या उत्कृष्ट हालचाली, जबरदस्त स्मॅशसह प्रतिस्पर्धी खेळाडूची निराशा केली. सायनाचा सत्रातील हा दुसरा किताब आहे.
सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूचा खूप चांगल्या प्रकारे अंदाज घेतला होता. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सायनासाठी महत्त्वपूर्ण ठरला. दुसरीकडे इंडिया...इंडिया अशा जयघोषाने इतानोनची एकाग्रता मात्र भंग झाली. याचा फायदा उचलून सायनाने पहिल्या सेटमध्ये ११-५ अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये सुद्धा सायनाने ५-० अशी आघाडी घेतली. ब्रेकपर्यंत सायनाने ११-६ अशी मजबूत आघाडी घेतली होती. त्यानंतर इतानोनने हे अंतर १८-१४ असे कमी केले. मात्र तिचे दोन स्ट्रोक बाहेर गेल्याने सायनाने किताब आपल्या नावे केला. (वृत्तसंस्था)
> के. श्रीकांतचा धडाका
दुसऱ्या बाजूला पुरुष गटात के. श्रीकांतने देखील इतिहास नोंदवला. के. श्रीकांतने अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या विक्टोर एक्सल्सेनचा पिछाडीवर पडल्यानंतर १८-२१, २१-१३, २१-१२ असा पाडाव करून झुंजार विजेतेपद पटकावले.