सुपर सायना फायनलमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2015 12:01 AM2015-08-16T00:01:13+5:302015-08-16T00:01:13+5:30
सुपर सायनाने भारतीयांसाठी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करताना इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या अंतिम फेरीत
जकार्ता : सुपर सायनाने भारतीयांसाठी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करताना इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. विजेतेपदासाठी सायनासमोर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व गतविजेती स्पेनच्या बलाढ्य कॅरोलीना मारिनचे आव्हान असेल.
पहिल्या सेटच्या सातव्या मिनिटालाच फेनात्रीला गुडघा दुखावल्याने उपचार घ्यावे लागले. या वेळी सायना एका गुणाने ६-७ अशी पिछाडीवर होती. मात्र तरीदेखील फेनात्रीने चांगली लढत देताना सायनाला विजयासाठी झुंजवले. परंतु, सायनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या सेटमध्ये बाजी मारून सामन्यात आघाडी घेऊन फेनात्रीला दबावाखाली आणले.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलादेखील दोन्ही खेळाडूंनी चुरशीचा खेळ केला. शेवटच्या काही मिनिटांमध्ये सायनाने घेतलेली आघाडी टिकवून ठेवली; तर फेनात्रीनेदेखील कडवी झुंज देताना पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. परंतु दुखापतीमुळे तिच्या खेळावर व हालचालींवर मर्यादा येत होत्या. मात्र तरीदेखील सायनाच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. फेनात्रीने याआधी कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. तसेच बिगरमानांकित असताना तिने उपांत्य फेरीत धडक मारताना सर्वांनाच चकित केले.
विजेतेपदासाठी आता सायनाची लढत रविवारी बलाढ्य कॅरोलीनाविरुद्ध होईल. गतविजेत्या असलेल्या कॅरोलीनाने सर्वांनाच आपल्या खेळाने आकर्षित केले आहे.
५५ मिनिटांच्या सामन्यात सायना नेहवालने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनात्रीचा दोन सरळ सेटमध्ये २१-१७,
२१-१७ असा पाडाव केला.
सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या सायनाने नंतर फेनात्रीला हिसका दाखवताना बाजी मारली.
स्वातंत्र्य दिनी विजयी भेट!
एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने लंकेविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर सायनाने या कामगिरीसह भारतीयांना स्वातंत्र्य दिनी विजयी खेळाची भेट दिली.