सुपर सिरीजची अंतिम फेरी मोठा पल्ला
By admin | Published: September 22, 2015 11:52 PM2015-09-22T23:52:13+5:302015-09-22T23:52:13+5:30
दुखापतीमुळे तब्बल सात महिन्यांनी कोर्टवर उतरताना पुनरागमन करणे खूप आव्हानात्मक होते. सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणे हे एक स्वप्न होते
नवी दिल्ली : दुखापतीमुळे तब्बल सात महिन्यांनी कोर्टवर उतरताना पुनरागमन करणे खूप आव्हानात्मक होते. सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणे हे एक स्वप्न होते. कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत खेळणे माझ्यासाठी खूप मोठा पल्ला आहे, असे भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयराम याने सांगितले. नुकत्याच झालेल्या कोरिया ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्यानंतर त्याने आपले मत व्यक्त केले.
अंतिम फेरीत जयरामला चीनच्या बलाढ्य व जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चेन लाँगविरुद्ध पराभूत व्हावे लागले. मी लहानपणापासून पीटर गेड, लिन डैन आणि तौफिक हिदायत यांचा खेळ पाहत आलो. सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात खेळणे माझे स्वप्न होते, असेही जयरामने सांगितले.
खांद्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा खेळण्यास सुरुवात केलेला जयराम पुनरागमनाविषयी म्हणाला, की दुखापतीतून सावरणे सोपं नसतं. सुरुवातीला मी चार महिन्यांनंतर पुन्हा खेळू शकेल असे वाटले होते. मात्र रिहॅबिलिटेशन सर्वांत आव्हानात्मक होते. या वेळी अनेक चढ-उतार आले आणि अनेकदा मी स्वत:च्या तंदुरुस्तीबाबत चिंतीत होतो. या वेळी मला पुनरागमन आणि चांगल्या प्रदर्शनासाठी प्रोत्साहन मिळाले आणि परिवारासह वेळ घालवल्याचा जास्त आनंद मिळाला.
कोरिया ओपन स्पर्धेत सुरुवातीपासून चमकदार खेळ केल्यानंतर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर जयराम म्हणाला, की स्पर्धेची सुरुवात चांगली झाली. जपान ओपनमध्ये मी विक्टर एक्सेलसन विरुद्ध पराभूत झालो होतो. मात्र कोरिया ओपनमध्ये पहिल्याच सामन्यात त्याला नमवल्याने माझा आत्मविश्वास उंचावला. त्यानंतर मला दोन वेळा पराभूत केलेल्या तियेन चेनलादेखील
पराभूत केल्याने माझा आत्मविश्वास आणखी वाढला.
रँकिंगविषयी चिंता नाही...
सध्या जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या जयरामने रँकिंगविषयी चिंतित नसल्याचे सांगितले. मी माझ्या जागतिक रँकिंगविषयी चिंतित नसून पुढील वर्षी मी अव्वल २५ खेळाडूंमध्ये पोहोचेल. मात्र मी सातत्यपूर्ण कमगिरीवर लक्ष केंद्रित केले असून, यापुढे नियमितपणे क्वार्टर फायनल व सेमीफायनल गाठेन, असा विश्वास जयरामने व्यक्त केला.(वृत्तसंस्था)