आकांक्षाचा शानदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:08 AM2018-06-18T05:08:20+5:302018-06-18T05:08:20+5:30

महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे हिने मुंबईत सुरु असलेल्या महिला ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकादार कामगिरी करताना एका गुणाची कमाई करताना आठव्या फेरीअखेर पाचवे स्थान मिळवले.

Superb victory of aspiration | आकांक्षाचा शानदार विजय

आकांक्षाचा शानदार विजय

Next

मुंबई : महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे हिने मुंबईत सुरु असलेल्या महिला ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकादार कामगिरी करताना एका गुणाची कमाई करताना आठव्या फेरीअखेर पाचवे स्थान मिळवले. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मोनिषा जी. के. हिनेही एका गुणासह लक्ष वेधले.
आॅल इंडिया चेस फेडरेशनच्या (एआयसीएफ) मान्यतेने आणि इंडियन चेस स्कूल व साऊथ मुंबई चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने चेंबूर येथील द एकर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत रविवारी आकांशा आणि मोनिषा यांनी लक्षवेधी कामगिरी केली. विशेष म्हणजे दोन्ही भारतीयांनी काळ्या मोहऱ्यांसह खेळताना बाजी मारली. आकांक्षाने रशियाच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर एलेना तोमिलोव्हा हिला धक्का देताना चतुर खेळ केला. एलेनाने इंग्लिश ओपनिंग पद्धतीने सुरुवात केल्यानंतर आकांक्षाने अप्रतिम चाल रचली. तिने एलेनाच्या राजाला बाहेर काढण्यासाठी आपल्या पाद्याचा बळी दिला आणि आकांक्षाच्या जाळ्यात अडकलेल्या एलेनाकडून अपेक्षित व गंभीर चूक झाली. याचा फायदा घेत आकांक्षाने सर्व बाजूने एलेनाची कोंडी केली. अखेर ३२व्या चालीला एलेनाने आपला पराभव मान्य केला.
मोनिषाने उझबेकिस्तानच्या महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा हिचा धक्कादायकरीत्या पराभव केला. भक्कम बचावावर भर दिलेल्या मोनिषाने गुलरुखबेगिमच्या सर्व आक्रमक चालींचा पाडाव केला. यामुळे गोंधळलेल्या गुलरुखबेगिमकडून माफक चुका झाल्या आणि त्याजोरावर मोक्याच्यावेळी बाजू भक्कम करत मोनिषाने बाजी मारली. दरम्यान, गुलिश्कन नाखबायेव्हा (कझाकस्तान - ६ गुण), बाखुयाग मुंगूनटूल (मंगोलिया - ५.५ गुण) आणि गुलरुखबेगिम (५ गुण) यांनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानावर कब्जा
करत स्पर्धेवर आपले वर्चस्व राखले आहे.

Web Title: Superb victory of aspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.