‘सुपरफास्ट’ सात्त्विक साईराज गिनीज बुकमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:49 AM2023-07-19T05:49:38+5:302023-07-19T05:52:31+5:30
सर्वांत वेगवान हिटचा नोंदवला विश्वविक्रम
सोका (जपान) : भारताचा स्टार शटलर सात्त्विक साईराज रंकीरेड्डी याने तब्बल ५६५ किमी प्रतिताशी तुफानी वेगाचा स्मॅश नोंदवला. यासह तो सर्वात वेगाने फटका मारणारा पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. सात्त्विक साईराजच्या या विश्वविक्रमाची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे.
जूनमध्ये झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेत सात्त्विकने चिराग शेट्टीसह खेळताना पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. त्याने मलेशियाच्या टेन बून हियोंग याचा सुमारे एक दशकाहून जुना असलेला विश्वविक्रमही मोडला. होयोंगने ४९३ प्रतितास इतक्या वेगाने स्मॅश मारला होता. सात्त्विकच्या स्मॅशचा वेग एका फॉर्म्युला कारने गाठलेल्या ३७२.६ किमी प्रतितास वेगाहूनही अधिक होता.
महिलांमध्ये सर्वात वेगवान स्मॅशचा विश्वविक्रम मलेशियाच्या टेन पियर्लीच्या नावावर आहे. पियर्लीने ४३८ किमी प्रतितास इतक्या वेगाने स्मॅश मारला आहे. सात्त्विकने हा विश्वविक्रम १४ एप्रिल २०२३ रोजी नोंदवला होता आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत परीक्षकांनी त्या दिवशी नोंदवलेल्या वेगाच्या आधारे या विश्वविक्रमाची निश्चिती केली. सात्त्विकने हा स्मॅश जपानमध्ये सोका येथील एका आघाडीच्या क्रीडा साहित्य कंपनीच्या जिममध्ये मारला होता.
सात्त्विक - चिराग
दुसऱ्या फेरीत
येओसू (कोरिया) : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या भारताच्या स्टार पुरुष जोडीने मंगळवारी येथे कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. सलामी लढतीत भारतीय जोडीने थायलंडचे जोमकोह-केद्रेन या जोडीवर २१-१६, २१-१४ ने मात केली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेले सात्त्विक- चिराग यांना पुढील फेरीत चीनचे ही जी टिंग - झोउ हाओ डोंग यांच्याविरुद्ध खेळावे लागेल. एमआर अर्जुन- ध्रुव कपिला या २७ व्या स्थानावरील भारतीय जोडीला अर्जुनच्या पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली. पाठदुखी सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू पहिल्या गेममध्ये ५-६ ने माघारले होते.