‘सुपरमॉम’ मेरी कोम जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:36 AM2019-01-11T08:36:11+5:302019-01-11T08:37:30+5:30
कामगिरीत सातत्य राखल्यामुळे मेरीकोम हिने हा सन्मान मिळविला. मेरीसाठी २०१८ हे वर्ष फार लाभदायी ठरले.
नवी दिल्ली : येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोम हिने ४८ किलो वजन गटात विश्वविक्रमी सहावे विजेतेपद मिळवले होते. आता ‘सुपरमॉम’ मेरीने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी मोठी कामगिरी करताना बॉक्सिंग क्रमवारीत (एआयबीए) अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
कामगिरीत सातत्य राखल्यामुळे मेरीकोम हिने हा सन्मान मिळविला. मेरीसाठी २०१८ हे वर्ष फार लाभदायी ठरले. राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकविले होते. या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर तिला नव्याने जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत ७०० गुणांसह ४८ किलो वजन गटात अव्वल स्थान मिळाले. २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेत मेरी ५१ किलो वजनी गटातून सुवर्ण पदक पटकावण्याचा प्रयत्न करेल. ४८ किलो वजन गटाचा २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.
याशिवाय, भारताच्या पिंकी जांगडाने ५१ किलो वजन गटात आठवे स्थान पटकविले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी मनीषा मौन हिने ५४ किलो वजन गटात आठवे आणि सोनिया लाठेरने ५७ किलो गटात दुसरे स्थान पटकविले आहे. विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती सिमरनजित कौर ही ६४ किलोमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन आहे. ती चौथ्या स्थानावर असून माजी विश्व विजेती एल. सरितादेवी १६ व्या स्थानी आहे. इंडिया ओपनची सुवर्ण विजेती तसेच विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पाचव्या स्थानावर आली. पुरुषांची रँकिंग अद्याप जाहीर झालेली नाही.