श्रीनिवासनप्रकरणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
By admin | Published: September 19, 2015 03:45 AM2015-09-19T03:45:10+5:302015-09-19T03:45:10+5:30
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख या नात्याने बोर्डाच्या आमसभेत सहभागी होऊ शकतात का, यावर निर्णय मागणाऱ्या बोर्डाच्या याचिकेची
नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख या नात्याने बोर्डाच्या आमसभेत सहभागी होऊ शकतात का, यावर निर्णय मागणाऱ्या बोर्डाच्या याचिकेची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी तयारी दर्शविली.
न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे ही याचिका सुनाणवीसाठी आली. या याचिकेवर सुनावणी केली जाईल पण तारीख निश्चित नसल्याचे पीठाने स्पष्ट केले. कायदेशीर स्पष्टीकरण मिळावे यासाठी याचिकेवर लवकर सुनावणी करण्याचा आग्रह बीसीसीआयकडून ज्येष्ठ विधिज्ञ के. के. वेणुगोपाल यांनी केला. श्रीनिवासन हे चेन्नई सुपरकिंग्जचे मालक या नात्याने हक्क सोडेपर्यंत बीसीसीआयची कुठलीही निवडणूक लढवू शकणार नाहीत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने २२ जानेवारी रोजी दिला होता.
या आदेशावर स्थिती स्पष्ट करण्याची विनंती बीसीसीआयने न्यायालयाला केली आहे. बीसीसीआयच्या आमसभेत सहभागी होण्याबाबत श्रीनिवासन यांच्या उपस्थितीस वैधानिक मान्यता स्पष्ट नसल्याचे बोर्डाचे मत असल्याने कोलकाता येथील आमसभेला श्रीनिवासन उपस्थित होताच आमसभा अनिश्चित काळासाठी
लांबणीवर टाकण्यात आली होती. एक प्रशासक म्हणून आणि सीएसकेची मालकी असलेल्या इंडिया सिमेंटचे मालक या नात्याने कुठलीही दुहेरी भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिले होते. मी तामिळनाडू क्रिकेट संघटनेचा प्रमुख या नात्याने बैठकीत सहभागी होत असल्याचा युक्तिवाद करीत श्रीनिवासन यांनी त्या वेळी न्या. कृष्णा रॉय यांचा उल्लेख करीत बैठकीत सहभागी होऊ शकत असल्याचे सांगितले होते. (वृत्तसंस्था)