सुशीलकुमारचा निर्णय लांबणीवर
By admin | Published: May 28, 2016 03:46 AM2016-05-28T03:46:24+5:302016-05-28T03:46:24+5:30
दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने आॅलिम्पिक कोटा मिळविणारा मल्ल नरसिंग यादवसोबत ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घेण्याच्या मागणीसाठी
नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने आॅलिम्पिक कोटा मिळविणारा मल्ल नरसिंग यादवसोबत ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घेण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारपर्यंत लांबणीवर पडली आहे.
सुशीलने दिल्ली हायकोर्टात कुस्ती महासंघाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. क्रीडा क्षेत्रातील बहुचर्चित बनलेल्या या मुद्यावर कुठलाही तोडगा निघू शकला नाही. सोमवारी अडीच वाजेपर्यंत हे प्रकरण स्थगित ठेवण्यात आले.
सुनावणी स्थगित झाल्यानंतर न्यायालय इमारतीबाहेर पडलेल्या नरसिंगने दोन तासापासून ताटकळलेल्या मीडिया प्रतिनिधींशी कुठलीही चर्चा केली नाही. सुशीलचे गुरू महाबली सतपाल यांनी मात्र सुशीलचे वकील अमित सिब्बल यांनी आपल्या अशिलाची बाजू भक्कमपणे मांडल्याचे सांगितले. पद्मभूषण पुरस्कारप्राप्त महाबली पुढे म्हणाले, ‘आमच्या मते युक्तिवाद चांगला झाला. आम्हाला आशा आहे. कुस्ती महासंघाच्या वकिलाने विश्व चॅम्पियनशिप आॅलिम्पिकपेक्षा मोठी असते, असे सांगितल्याने मात्र भ्रमनिरास झाला. (वृत्तसंस्था)