लीगमध्ये सुशीलला बंदी नाही : बृजभूषण
By admin | Published: November 4, 2016 04:15 AM2016-11-04T04:15:16+5:302016-11-04T04:15:16+5:30
दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याला प्रो-कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण नाही
नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याला प्रो-कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण नाही, असे स्पष्टीकरण भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांनी केले आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथे झालेल्या फॅशन शोपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.
ब्रृजभूषण यांनी सांगितले की, सुशील गेल्या सत्रात सुरवातीला या सत्रात सहभागी झाला होता, लिलावासाठी तो तयारही झाला होता, परंतु नंतर तो लीगमधून बाहेर पडला, परंतु या सत्रामध्ये कोणावरही बंदी घालण्यात आली नसल्याचे सिंह यांनी केले. ज्याला खेळायचे आहे, त्यांनी फेडरेशनला लेखी कळवावे, त्याला सहभागी करुन घेतले जाईल.
गेल्यावर्षी दुखापतीमुळे सुशीलने माघार घेतली होती, तर यंदा त्याचा नरसिंग यादव प्रकरणावरुन फेडरेशनशी वाद झाला होता. त्यामुळे त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उठत आहे. कुस्ती लीगचे प्रमोटर प्रो स्पोर्टीफायचे संस्थापक कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची लीग मोठी असेल. संघांची संख्या सहावरुन आठ करण्यात आली आहे. ३१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला आपला आयकॉन निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी कुस्ती सुरु असताना डगआउटमध्ये बसलेले संघ सहकारी मल्ल आणि सपोर्ट स्टाफ यांच्या हृदयाचे ठोके मोजण्यात येणार आहेत, त्यासाठी त्यांच्या शरीरावर एक चिप बसवण्यात येणार आहे. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मल्ल साक्षी मलिक हिने सांगितले की, या लीगमुळे आम्हाला खूप फायदा झाला. पहिल्या सत्रात एडेलिन ग्रे यांच्यासारख्या वर्ल्ड चॅम्पियन पैलवानासोबत सराव केल्यामुळे माझ्या खेळात खूपच फरक पडला. त्यामुळे दुसऱ्या सत्रासाठी मी उत्साहीत आहे. (वृत्तसंस्था)