सुशील की नरसिंग! रिओला जाणार कोण?
By admin | Published: May 11, 2016 02:43 AM2016-05-11T02:43:22+5:302016-05-11T02:43:22+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीच्या फ्री स्टाईल प्रकारात ७४ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंग यादव दावा करीत आहे
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीच्या फ्री स्टाईल प्रकारात ७४ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंग यादव दावा करीत आहे. दुसरीकडे दोन आॅलिम्पिक पदकाचा मानकरी सुशीलकुमारने आॅलिम्पिकला सर्वोत्कृष्ट मल्ल पाठविण्यासाठी चाचणी घेण्याची मागणी केली आहे. अनुभवी सुशील की नरसिंग याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाला घ्यावा लागेल. त्यासाठी चाचणी घ्यायची की नाही हेदेखील ठरवायचे आहे.
सुशील म्हणाला, ‘‘मी केवळ चाचणीसाठी बोलतो आहे. रिओला मला पाठवा असे म्हणत नाही. माझ्यात व नरसिंग यांच्यात जो मल्ल उत्कृष्ट असेल त्याला रिओला पाठवा इतकेच माझे म्हणणे आहे.
कोटा देशाला मिळतो,
एखाद्या व्यक्तीला नव्हे. त्यामुळेच दोन चांगले दावेदार असतील तर त्यापैकी सर्वोत्कृष्ट एका मल्लाला संधी मिळायला हवी.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘सध्याचा विश्वविजेता आणि आॅलिम्पिक चॅम्पियन जॉर्डन बरोग यालादेखील अमेरिकेच्या संघात स्थान मिळविण्यासाठी चाचणीतून जावे लागले. प्रत्येक देशात असेच होते.’’ भारतीय कुस्ती महासंघाने अद्याप चाचणीचा निर्णय घेतला नसल्याने ७४ किलो वजन गटाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर सुशील म्हणतो, ‘‘साई आणि सरकारने माझ्या तयारीवर वारेमाप खर्च केला. याचा लाभ मला झाला किंवा नाही हे आता सिद्ध करण्याची माझी तयारी असेल.’’
२००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचे कांस्य आणि २०१२च्या लंडन आॅलिम्पिकचे रौप्य पटकविणारा ३२ वर्षांचा सुशील पुढे म्हणाला, ‘‘रिओत स्वत:ला पदकविजेता बनविणे ही माझी जबाबदारी आहे. चाचणी होईल किंवा नाही, याचा निर्णय महासंघाने घ्यावा. माझी तयारी नसती तर चाचणी घ्या असे म्हणण्याचे धाडस केलेच नसते. मी यासाठी बोलतो आहे कारण पूर्णपणे फिट आहे. मी रिओत पदक जिंकू शकतो असा विश्वासदेखील आहे.’’
नरसिंग यादवने गतवर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ७४ किलो वजन गटात कांस्य जिंकून भारताला या गटाचा आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला होता. तेव्हापासून महाराष्ट्राचा हा मल्ल या स्थानासाठी दावेदारी करीत आहे. पण माजी विश्वविजेता सुशीलकुमारचा युक्तिवाद असा, की ‘‘एका वजन गटासाठी अनेक दावेदार असताना आधीदेखील चाचणी झाली आहे. १९९२ आणि १९९६च्या आॅलिम्पिकपूर्वीदेखील चाचणी झाली होती. मागच्या आॅलिम्पिकच्या वेळी स्पर्धा नसल्यामुळे चाचणी घेण्याची गरज भासली नसेल. माझ्या वजनगटात प्रतिस्पर्धी नव्हता पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.’’
सुशीलने ६६ किलो फ्री स्टाईल प्रकारात दोनदा आॅलिम्पिक पदके जिंकली, पण ७४ किलो वजनगटात दाखल झाल्यापासून त्याने २०१४ मध्ये केवळ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात सुवर्णपदकही जिंकले. सध्या तो सोनिपतमध्ये सराव करीत आहे. (वृत्तसंस्था)मी आधी तीन आॅलिम्पिकला जाऊन आलो. त्यापैकी दोन वेळा पदके जिंकली. भारताला आणखी एक पदक जिंकून देण्याचे लक्ष्य आखले आहे.
- सुशीलकुमार, मल्ल