डोपप्रकरणी अॅथ्लेटिक्स कोच कुन्ही निलंबित
By Admin | Published: June 9, 2017 04:06 AM2017-06-09T04:06:44+5:302017-06-09T04:06:44+5:30
अव्वल धावपटूच्या खोलीत प्रतिबंधित पदार्थ आढळताच भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने ४०० मीटरचे कोच मोहम्मद कुन्ही यांना पदावरून निलंबित केले.
नवी दिल्ली : पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील(साई) एका अव्वल धावपटूच्या खोलीत प्रतिबंधित पदार्थ आढळताच भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने ४०० मीटरचे कोच मोहम्मद कुन्ही यांना पदावरून निलंबित केले.
एप्रिल महिन्यात नाडा आणि साईच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत पालच्या बॅगमधून प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यावर या खेळाडूला तात्काळ निलंबित करण्यात आले शिवाय ज्या तीन कोचेसना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यात कुन्ही यांचाही समावेश होता. राष्ट्रीय कोच बहादूरसिंग आणि त्यांचे सहायक राधाकृष्णन नायर यांना एएफआयने कारणे दाखवा नोटीस बजावली. केरळचा २७ वर्षांचा पाल हा सर्वोत्कृष्ट भारतीय धावपटूंमध्ये गणला जातो. तो ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच इंचियोन आशियाडमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या रिले संघाचा सदस्य राहिला आहे.(वृत्तसंस्था)