स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली मुंबई रणजी संघातील खेळाडू निलंबित
By admin | Published: July 13, 2015 12:55 PM2015-07-13T12:55:18+5:302015-07-13T13:18:23+5:30
राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूला फिक्सिंगची ऑफर दिल्याबद्दल मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहा याला बीसीसीआयने निलंबित केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - स्पॉट फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहा याला बीसीसीआयने निलंबित केले आहे. मुंबई रणजी संघातील सहकारी व आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणा-या प्रवीण तांबेला मॅचफिक्सिंगची ऑफर दिल्याचा हिकेनवर ठेवण्यात आला आहे. मात्र प्रवीणने ती ऑफर न स्वीकारता तत्काळ या घटनेची माहिती राजस्थान रॉयल्सच्या टीममधील अधिका-यांना दिल्याचे समजते. राजस्थानच्या टीमने या घटनेची तक्रार बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटकडे केली असता बीसीसीआयने निलंबनाची ही पावले उचलली.
'मुंबईचा खेळाडू असलेल्या हिकेन शहाचे तातडीने निलंबन करण्यात येत आहे. त्याने खेळाडूंसाठी असलेल्या बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी नियमावलींचे उल्लंघन केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे ' असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्यार्फे जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 'बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीकडून पुढील कोणतेही आदेश मिळेपर्यंत हिकेन बीसीसीआयशी संलग्न असलेल्या कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात सहभागी होऊ शकत नाही' असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आयपीएलमधील कोणत्याही संघात समावेश न झालेल्या ३० वर्षीय हिकेनने मुंबईसाठी आत्तापर्यंत ३७ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २१६० धावा केल्या आहेत.