‘एचसीए’च्या निकालाला स्थगिती
By admin | Published: January 18, 2017 05:07 AM2017-01-18T05:07:35+5:302017-01-18T05:07:35+5:30
मोहम्मद अझहरुद्दीचा अध्यक्षपदासाठीचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आज, मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेची (एचसीए) निवडणूक झाली.
हैदराबाद : मोहम्मद अझहरुद्दीचा अध्यक्षपदासाठीचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आज, मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेची (एचसीए) निवडणूक झाली.
अध्यक्षपदासाठी माजी खासदार जी. विवेकानंद आणि विद्युत जयसिम्हा यांच्यादरम्यान लढत होती. उपाध्यक्षपदासाठी अनिल कुमार आणि इम्रान महमूद समोरासमोर होते. सचिव पदासाठी टी. शेषनारायण एकमेव उमेदवार होते.
हैदराबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. एचसीएचे सचिव जॉन मनोज व अन्य पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालायने ११ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने निर्देश दिले की, पुढील आदेश मिळेपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर करता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी होणार आहे.
त्याआधी, अध्यक्षपदासाठी अझहरुद्दीचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला. निवडणूक अधिकारी राजीव रेड्डी यांनी सांगितले की, अझहरुद्दीन ज्या क्लबचे प्रतिनिधित्व करीत आहे त्या क्लबचा तो पात्र मतदार आहे किंवा नाही, हे स्पष्ट होत नाही. (वृत्तसंस्था)