मोहम्मद इरफानवर निलंबनाची कारवाई
By admin | Published: March 15, 2017 01:20 AM2017-03-15T01:20:00+5:302017-03-15T01:20:00+5:30
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर संशयित सट्टेबाजाच्या संपर्कात असलेल्या कारणास्तव मंगळवारी निलंबनाची कारवाई केली
कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर संशयित सट्टेबाजाच्या संपर्कात असलेल्या कारणास्तव मंगळवारी निलंबनाची कारवाई केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कथित भ्रष्टाचारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत इरफान दोषी आढळलेला तिसरा खेळाडू ठरला आहे.
पीसीबीने म्हटले की, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करीत आहे. पीसीबी भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार इरफानला नोटीस बजाविण्यात आली आहे. इरफानला संहितेच्या कलम २.४.४ च्या दोननुसार दोषी ठरविण्यात आले आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे १४ दिवसांचा कालावधी आहे.’
बोर्डाने पुढे म्हटले की, त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार निलंबित होणारा पाकिस्तानचा तो तिसरा खेळाडू आहे. पीसीबीने शार्जिल खान व शालिद लतीफ यांना पीएसएलच्या दुसऱ्याच दिवशी दुबईतून परत पाठविण्यात आले होते. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.’
इरफान सोमवारी पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे सदस्य व कायदे तज्ज्ञांपुढे उपस्थित झाला होता. बोर्डाच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार इरफानने एका कथित सट्टेबाजाची भेट घेतली होती. सट्टेबाजाने सामन्यात स्पॉट फिक्सिंग करण्यास सांगितले होते. इरफानने सट्टेबाजासोबत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
पीसीबीचे चेअरमन शहरयार खान म्हणाले, ‘जर कुठलाही खेळाडू दोषी आढळला तर त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात येईल. बोर्ड कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करू शकत नाही.’ (वृत्तसंस्था)
इरफानने सट्टेबाजाचा
कुठलाही प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला, पण त्याने या प्रकरणाची माहिती बोर्डाला दिली नसल्याचे वृत्त आहे. आईच्या मृत्यूच्या घटनेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून दडपणाखाली असल्याचा दावा इरफानने केला आहे.
पाकिस्तान सुपर लीगच्या लढतीत सामना फिक्स करण्याबाबत कुठला प्रस्ताव मिळाल्याचे वृत्त त्याने फेटाळले. अन्य निलंबित खेळाडूंनीही काही चुकीचे केल्याचे आरोप फेटाळले होते. त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी एका लवादाची स्थापना करण्यात आली आहे.