स्वप्निल, अंकितची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

By Admin | Published: October 15, 2016 01:44 AM2016-10-15T01:44:30+5:302016-10-15T01:44:30+5:30

कर्णधार स्वप्निल गुगळे (३५१*) आणि अंकित बावणे (२५८*) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ५९४ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी

Swapnil, Ankit Record Break Partnership | स्वप्निल, अंकितची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

स्वप्निल, अंकितची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

googlenewsNext

मुंबई : कर्णधार स्वप्निल गुगळे (३५१*) आणि अंकित बावणे (२५८*) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ५९४ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी स्पर्धेत दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात २ बाद ६३५ धावांचा हिमालय उभा केला. महाराष्ट्राने आपला डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर दिल्लीने ५ षटकांत बिनबाद २१ अशी मजल मारली.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व राखले. गुगळे - बावणे यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी भागीदारी रचली. विशेष म्हणजे श्रीलंकेच्या कुमार संगकारा - माहेला जयवर्धने यांनी २००६ साली कोलंबो येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली ६२४ धावांची सर्वाधिक धावांची भागीदारी मोडण्याची संधी गुगळे - बावणे यांना होती. परंतु, कर्णधार गुगले याने संघहिताला महत्त्व देताना डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. दखल घेण्याची बाब म्हणजे, हा विक्रम मोडण्यासाठी ही जोडी केवळ ३१ धावा दूर होती. मात्र, तरीही त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक गाठला.
गुगळेने ५२१ चेंडूंचा सामना करताना तब्बल ३७ चौकारांसह ५ षटकारांची आतषबाजी करून नाबाद ३५१ धावांचा तडाखा दिला, तर त्याला उपयुक्त साथ दिलेल्या बावणे याने ५०० चेंडूंमध्ये १८ चौकार व २ षटकारांसह नाबाद २५८ धावा चोपल्या. या दोघांच्या भल्यामोठ्या भागीदारीच्या जोरावर २ बाद ४१ धावा अशा प्रतिकूल प्ररिस्थितीतून महाराष्ट्राने २ बाद ६३५ धावांची भरारी घेतली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुगळे - बावणे यांनी दिल्लीकर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना त्यांना दिवसभरामध्ये एकही यश मिळू दिले नाही. तसेच, ही जोडी फोडण्यासाठी दिल्लीचा कर्णधार उन्मुक्त चंद याने स्वत:सह एकूण ९ गोलंदाज वापरले. मात्र, तरीही गुगळे - बावणे यांना रोखणे दिल्लीकरांना जमले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Swapnil, Ankit Record Break Partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.