राष्ट्रीय कबड्डी : स्वप्नील, अंकिताकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:31 PM2020-02-25T23:31:00+5:302020-02-25T23:31:41+5:30
जयपूर येथे ३-७ मार्च दरम्यान होणाºया या स्पर्धेत महाराष्ट्राची भिस्त प्रामुख्याने युवा खेळाडूंवर राहील.
मुंबई : आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी स्वप्नील शिंदेची महाराष्ट्राच्या पुरुष संघाची, तर अंकिता जगतापकडे महिला संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. जयपूर येथे ३-७ मार्च दरम्यान होणाºया या स्पर्धेत महाराष्ट्राची भिस्त प्रामुख्याने युवा खेळाडूंवर राहील.
या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत रिशांक देवाडिगा आणि विशाल माने यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा महाराष्ट्र संघात समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकताच रिशांकला शिवछत्रपती पुरस्काराने गौराविण्यात आले होते. मात्र रत्नागिरी येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत हे दोघेही खेळले नसल्याने दोघांची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
पुरुष संघाची धुरा युवा स्वप्नीलकडे सोपविण्यात आली असून या संघामध्ये शुभम शिंदे, रोहीत बन्ने, बिपीन थळे, आकाश कदम, सुशांत सेल, तुषार पाटील, अजिंक्य पवार, पंकज मोहिते, मनोज बोंद्रे आणि संकेत सावंत, महारूद्र गर्जे यांचा समावेश असून आशिष म्हात्रे संघाचे प्रशिक्षक असतील. अंकिताच्या नेतृत्त्वातील महिला संघात पूजा शेलार, पौर्णिमा जेधे, सायली जाधव, सुवर्णा लोखंडे, सोनाली हेळवी, मेघा कदम, तेजस्वी पाटेकर, ऐश्वर्या काळे, श्रद्धा चव्हाण, पूजा जाधव आणि निकीता कदम यांचा समावेश असून सिमरन गायकवाड संघाच्या प्रशिक्षक आहेत.