Paris Olympic 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो - स्वप्नील कुसाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:52 PM2024-08-08T16:52:56+5:302024-08-08T16:59:26+5:30

मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकलं.

 Swapnil Kusale said, I feel proud to have been born in Chhatrapati Shivaji Maharaj's Maharashtra  | Paris Olympic 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो - स्वप्नील कुसाळे

Paris Olympic 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो - स्वप्नील कुसाळे

paris olympics 2024 updates : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लढण्यासाठी आणि खचलेल्या मनाला प्रेरणा देणारं नाव. मोजक्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांनी अनेकांसमोर आदर्श निर्माण केला. शिवाजी महाराजांना आदर्श मानून अनेकांनी यशाला गवसणी घातली. कित्येकजण महाराजांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आठवून यशाच्या शिखरावर पोहोचले. असाच शिवरायांंचा एक मावळा पॅरिसच्या धरतीवर भारताचा तिंरगा फडकावून आला. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक असं कांस्य पदक जिंकलं. त्यानं आपल्या या यशानंतर महाराष्ट्रात परतताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्मल्याचा अभिमान वाटतो, असं आवर्जुन सांगितलं. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये त्यानं नेमबाजीचा सराव केला होता. म्हणूनच स्टेडियमला भेट देण्यासाठी तो गुरुवारी दुपारी बालेवाडीला आला. या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि भारत माता की जय या जयघोषात त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकानं मोठं यश मिळवलं. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. पण, अखेरच्या काही क्षणांमध्ये स्वप्नील इतर पाच खेळाडूंना वरचढ ठरला आणि त्यानं तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. 

वृत्तसंस्था ANI शी बोलताना स्वप्नील कुसाळेनं सांगितलं की, मला खूप अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला याचा अभिमान वाटतो. एवढ्या वर्षांनी मोठ्या व्यासपीठावर देशासाठी आणि राज्यासाठी पदक जिंकण्याची संधी मला मिळाली.

 

ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून फक्त खाशाबा जाधव यांच्या नावाची नोंद होती. यात आता भर पडली असून तब्बल ७२ वर्षांनंतर स्वप्नीलच्या रूपात मराठमोळ्या खेळाडूला पदक जिंकण्यात यश आलं. स्वप्नील हा कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. २९ वर्षीय स्वप्नीलने २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. मात्र, ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला १२ वर्षे वाट पाहावी लागली. धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्नीलनं कॅप्टन कूलच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट अनेकदा पाहिला. दरम्यान, १९५२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलं होतं. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू बनण्याची संधी स्वप्नीलनं मिळवली आहे.

Web Title:  Swapnil Kusale said, I feel proud to have been born in Chhatrapati Shivaji Maharaj's Maharashtra 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.