स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:20 PM2024-10-14T12:20:20+5:302024-10-14T12:23:59+5:30

स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले.

Swapnil Kusale won a bronze medal in Paris Olympics 2024 and was given a check of Rs 2 crore by the Maharashtra government | स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

ऑलिम्पिक २०२४ च्या स्पर्धेत स्वप्नील कुसाळे याने दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले. मात्र, राज्य सरकारकडून त्याच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. स्वप्निलला राज्य सरकारने किमान पाच कोटी रुपये जाहीर करावे. त्याला बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. आता राज्य सरकारने दोन कोटी रुपयाचा धनादेश स्वप्निलला सोपवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

अजित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्तम कामगिरी करीत स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. यानिमित्ताने अभिनंदनपर स्वप्निलला राज्य सरकारच्या वतीने २ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले होते की, स्वप्निलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमीन, दागिने विकले. आता त्याचे पुढील ध्येय २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे असून, त्याला सुवर्ण पदक जिंकायचे आहे. सध्या सरकारने कांस्यपदक विजेत्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर केले आहेत. मात्र, खेळाचा खर्च पाहता ही रक्कम तोकडी आहे. भविष्यातील करिअरसाठी सरकारने स्वप्निलला मोठे आर्थिक पाठबळ द्यावे. 

कोण आहे स्वप्नील कुसाळे?
स्वप्नील सुरेश कुसाळे या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली होती. स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत असे. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता. स्वप्नील आपल्या सर्वोत्तम खेळांचे चांगले प्रदर्शन करून देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देईल याची आम्हाला खात्री आहे असे उद्गार वडिल सुरेश कुसाळे (सर) व आई सरपंच अनिता सुरेश कुसाळे यांनी दैनिक लोकमतशी बोलताना काढले होते. मात्र, स्वप्निलला सोनेरी कामगिरी करता आली नसली तरी त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. स्वप्निलच्या या यशाने कांबळवाडीचे गाव सर्वदूर पसरले. 

Web Title: Swapnil Kusale won a bronze medal in Paris Olympics 2024 and was given a check of Rs 2 crore by the Maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.