स्विस इनडोअर टेनिस : फेडररचा विक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:23 AM2019-10-28T01:23:26+5:302019-10-28T01:23:46+5:30
एकाच स्पर्धेत सर्वाधिक १५व्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा विश्वविक्रम
बासेल : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने घरच्या मैदानावर खेळताना ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपास याचा पराभव करत स्विस इनडोअर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे फेडररने या स्पर्धेत १५व्यांदा अंतिम फेरी गाठली असून कोणत्याही स्पर्धेत सर्वाधिक १५वेळा अंतिम फेरी गाठणारा फेडरर जगातील एकमेव व्यावसायिक टेनिसपटू ठरला.
जागतिक क्रमवारीतील तिसरा आणि स्पर्धेतील अव्वल मानांकित फेडररने एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात सित्सिपासचा ६-४, ६-४ असा फडशा पाडला. दखल घेण्याची बाब म्हणजे यंदाच्या वर्षातील फेडररचा हा ५०वा विजयही ठरला. आता फेडरर आपल्या घरच्या स्पर्धेत दहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी आॅस्टेÑलियाच्या अॅलेक्स डी मिनाउरविरुद्ध भिडेल. फेडरर कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच अॅलेक्सविरुद्ध खेळेल.
अॅलेक्सने अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या एली ओपेल्का याचा ७-६(२), ६-७(४), ७-६(३) असा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत झुंजार खेळ करताना अॅलेक्सने मोक्याच्या वेळी खेळ उंचावला.
या स्पर्धेत फेडररने २०१३ साली जुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्ध अखेरचा पराभव पत्करला होता. त्यामुळे आता अंतिम सामन्यात ओपेल्कापुढे जेतेपदासाठी तगडे आव्हान आहे.