सिडनी कसोटी : दिवसाखेर ऑस्ट्रेलिया २ बाद ३४८
By admin | Published: January 6, 2015 08:45 AM2015-01-06T08:45:27+5:302015-01-06T13:12:25+5:30
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवत ३४८ धावा केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ६ - भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवत ३४८ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरचे शानदार शतक (१०१) आणि रॉजर्सची दमदार खेळी (९५) यामुळे ऑस्ट्रेलियाने २००चा टप्पा सहज पार केला. वॉर्नरचे हे मालिकेतील तिसरे शतक आहे. मात्र त्यानंतर वॉर्नर व रॉजर्स एकापाठोपाठ एक असे बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया धक्का बसला. पण कर्णधार स्मिथने (नाबाद ८२) वॉटसनसह (नाबाद ५७) ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा सावरला. भारतातर्फे शमी व अश्विनने प्रत्येकी १ बळी टिपला.
मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावलेली आहे. याव्यतिरिक्त मेलबोर्नमध्ये अनिर्णित संपलेल्या तिस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. मात्र असे असले तरी भारतीय संघ नवा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक आहे.