सय्यद किरमाणी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
By admin | Published: January 5, 2016 11:59 PM2016-01-05T23:59:17+5:302016-01-05T23:59:17+5:30
मी कायम सर्वोत्तम कामगिरीचा निर्धार करून माझा खेळ केला आणि ती कामगिरी मी केली आहे. कायम तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी
मुंबई : मी कायम सर्वोत्तम कामगिरीचा निर्धार करून माझा खेळ केला आणि ती कामगिरी मी केली आहे. कायम तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी मी माझे योगदान दिले, असे उद्गार भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी काढले. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वार्षिक बक्षीस समारंभ मुंबईत पार पडला. या वेळी किरमाणी यांचा प्रतिष्ठेचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. तसेच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याला पॉली उम्रीगर पुरस्कार देऊन २०१४-१५ वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले.
पुन्हा एकदा सी. के. नायडू या महान खेळाडूसह नाव जोडल्याचा आनंद आहे. याआधी सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघात त्यांच्या कर्णधारपदी माझा समावेश होता. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे, अशा शब्दांत किरमाणी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. त्याचप्रमाणे विराट कोहलीने सांगितले की, गत आॅस्टे्रलिया दौरा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम होता. या दौऱ्यातील चमकदार कामगिरीचे श्रेय माझ्या संघाला जाते. विश्वचषकमध्ये पाकविरुद्धच्या लढतीत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. (क्रीडा प्रतिनिधी)