टी-२० विश्वचषक; भारतात येण्यासाठी पाक संघ रवाना
By admin | Published: March 12, 2016 05:32 AM2016-03-12T05:32:02+5:302016-03-12T05:34:54+5:30
लाहोरच्या आलामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पाकिस्तानी संघ दुबईसाठी रवाना झाला आहे. दुबईवरुन पाकिस्तानी संघ सायंकाळपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि.१२ - टी-२० क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या समावेशाबाबतची अनिश्चितता आज अखेर संपुष्टात आली आहे. भारताने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपला संघ भारतात पाठवला आहे. लाहोरच्या आलामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पाकिस्तानी संघ दुबईसाठी रवाना झाला आहे. दुबईवरुन पाकिस्तानी संघ सायंकाळपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. पाक संघाच्या ट्विटर खात्यावरुन ही माहीती मिळाली. विमनतळावरुन पाक संघाने दुबईसाठी प्रस्थान केल्यानंतर संघाच्या फोटोसह ट्विट करुन चाहत्यासाठी ही माहीती देण्यात आली. पाक संघाला २४ तास कडेकोट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन भारताच्या गृहमंत्र्यांनी तसेच गृहसचिवांनी दिल्यानंतर पंतप्रधानांनी संघ भारतात पाठवला आहे.
Pakistan Men Team departing for ICC #WT20 @ Allama Iqbal International Airport https://t.co/G1F5NVN59S
— PCB Official (@TheRealPCB) March 11, 2016
पाकिस्तानचा शुक्रवारी बंगाल रणजी संघाविरुद्ध खेळला जाणारा विश्व टी-२० सराव सामना रद्द करण्यात आला. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार पाकिस्तान शुक्रवारी बंगाल रणजी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार होता, पण बंगाल क्रिकेट संघटनेच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार हा सामना आता रद्द करण्यात आला आहे. पाक संघ दुसऱ्या सराव सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध खेळेल. पाक सरकार गेल्या आठवड्यापासून भारत सरकारकडून आपल्या संघाच्या सुरक्षेबाबत लेखी आश्वासनावर अडून होते. याशिवाय आम्ही संघ भारतात पाठविणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली होती.
दरम्यान, पाकिस्तान संघ नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहचत असल्यामुळे १९ मार्च रोजी भारत-पाक संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतीच्या तिकीट विक्रीला विलंब होत आहे. धरमशालाहून कोलकाता येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या या लढतीच्या तिकीट विक्रीला आता १६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे