टी शर्ट-लाडूचे आमिष, तरीही प्रेक्षकांनी फिरविली पाठ !
By admin | Published: September 22, 2016 07:38 PM2016-09-22T19:38:15+5:302016-09-22T19:38:15+5:30
भारत- न्यूझीलंड कसोटीनिमित्त स्टेडियम हाऊसफुल्ल व्हावे म्हणून मोफत टी शर्ट तसेच लाडूचे आयोजकांचे आमिष क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करू शकले नाही.
कानपूर : ऐतिहासिक ५०० व्या कसोटीसाठी ग्रीनपार्कवर सचिनसह अनेक दिग्गजांनी गुरुवारी हजेरी लावली. भारत- न्यूझीलंड कसोटीनिमित्त स्टेडियम हाऊसफुल्ल व्हावे म्हणून मोफत टी शर्ट तसेच लाडूचे आयोजकांचे आमिष क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करू शकले नाही. प्रेक्षक स्टेडियमपासून दूरच राहिले.
उभय संघ सकाळी ८.३० वाजता स्टेडियममध्ये दाखल झाले. त्यावेळी मोजके प्रेक्षक उपस्थित होते. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतल्याचे टीव्हीवर समजताच काही चाहते मैदानाकडे फिरकले. पण कडक ऊन होते.
त्यातच कोहली लवकर बाद होताच चाहत्यांनी काढता पाय घेतला. ग्रीनपार्कची प्रेक्षकक्षमता २६ हजार आहे. कोहली खेळत होता तेव्हा जवळपास ३० टक्के प्रेक्षक असावेत. पण त्याने निराश केल्याने चाहतेही निराश होऊन बाहेर पडले. जे प्रेक्षक शिल्लक होते त्यात शाळकरी विद्यार्थ्यांचाच भरणा होता. त्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने मोफत लाडू देण्याची तसेच ५०० वी कसोटी अविस्मरणीय ठरविण्यासाठी मोफत टी शर्ट देण्याची घोषणा आधीच केली होती. पण या लालसेपोटी येणाऱ्यांची संख्या नगण्य होती. सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी देखील तिकिटे आणि पास पाहण्यात शिथिलता बाळगली. यामुळे एका तिकिटावर संपूर्ण कुटुंब आत फिरताना दिसले. कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने प्रेक्षकांच्या तुलनेत सर्वत्र पोलीस अधिक दिसत होते. ग्रीनपार्कचा व्हीआयपी रस्ता सामान्यस्थितीत बॅरिकेड्सलावून बंद केला जातो पण सामन्याच्या दिवशी वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा ठेवण्यात आला. ज्यांना मोफत टी शर्ट आणि लाडू देण्यात आले ते देखील उपाहारानंतर स्टेडियममध्ये दिसेनासे झाले होते.
स्टेडियमबाहेर देखील शुकशुकाट होता. वन-डे दरम्यान संपूर्ण १२ गेटवर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. पण आज हे चित्र नसल्यामुळे पोलीस रिलॅक्स होते. मोफत पासवर प्रवेश करणारे प्रेक्षकही अभावानेच दिसले. यूपीसीएचे सीईओ ललित खन्ना यांनी पुढील चार दिवसांत सामन्यात रंगत येईल तशी गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रेक्षक नसल्याने स्टेडियमबाहेर टी शर्ट, रिस्ट बॅन्ड तसेच झेंडे विकणारे निराश होते. सुरक्षा तपासणीनंतर तिकिटाची सक्ती न करता प्रेक्षकांना आत सोडा असा आयोजकांकडून आदेश आल्याच्या वृत्तास एका पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला. इतके करूनही प्रेक्षक पहिल्या दिवशी दूरच राहिले