टी-२० स्पर्धेची रंगीत तालीम होणार
By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:46+5:302016-01-02T08:34:46+5:30
राष्ट्रीय अजिंक्यपद सय्यद मुश्ताक अली चषक टी-२० स्पर्धेत अनुभवी युवराजसिंग, हरभजनसिंग व आशिष नेहरा यांच्या कामगिरीकडे सर्र्वांचे लक्ष असेल. आगामी आॅस्ट्रेलिया दौरा
नवी दिल्ली : राष्ट्रीय अजिंक्यपद सय्यद मुश्ताक अली चषक टी-२० स्पर्धेत अनुभवी युवराजसिंग, हरभजनसिंग व आशिष नेहरा यांच्या कामगिरीकडे सर्र्वांचे लक्ष असेल. आगामी आॅस्ट्रेलिया दौरा व टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेला रंगीत तालमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शनिवारपासून (दि. २) २० जानेवारीपर्यंत देशातील वेगवेगळ्या शहरांत या स्पर्धेचे सामने होत आहेत. युवराज, नेहरा यांनी आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आपली निवड योग्य असल्याचे ते सिद्ध करू शकतील. युवराजचा संघात समावेश झाला असला, तरी दिल्ली डेअर डेव्हिल्सने त्याला आगामी आयपीएल मोसमासाठी संघातून मुक्त केले आहे. त्यामुळे तब्बल १६ कोटी रुपयांची बोली लावलेला हा खेळाडू इतर संघांसाठी करारबद्ध होण्यासाठी उपलब्ध झाला आहे.
याशिवाय, या सामन्याद्वारे अन्य खेळाडू निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करतील. येत्या १२ जानेवारीपासूनआॅस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे. त्यासाठी यापूर्वीच संघाची घोषणा झाली आहे. मात्र, यंदा फेब्रुवारीत होणारी आशियाई चषक स्पर्धा टी-२० स्वरूपात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी यंदा त्याचे प्रारूप बदलण्यात आले आहे. या स्पर्धेनंतर मार्चमध्ये भारतातच टी-२० विश्वचषक स्पर्धा होत आहे.