तायवानमध्ये बेसबॉल सामन्यात खेळाडूंमध्ये ‘राडा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:48 PM2020-04-20T23:48:10+5:302020-04-20T23:48:23+5:30
कोरोना संकट : ‘सोशल डिस्टन्सिंग’ नियमाचा उडाला फज्जा
तायपेई : तायवानमधील रिकाम्या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करुन कोरोना व्हायरसच्या महाप्रकोपातही बेसबॉल लीग सुरू ठेवण्यात हा देश यशस्वी ठरला आहे. तथापि दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये मैदानात ‘राडा’ झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याची घडना रविवारी घडली.
कोरोना व्हायरसवर यशस्वी उपाययोजना करणारा आदर्श देश या भूमिकेतून तायवानकडे पाहण्यात येत आहे. चीनचा शेजारी असलेल्या या देशाचे मोठ्या प्रमाणावर चीनशी आर्थिक नातेदेखील आहे. तरीही येथे कोरोनाबाधितांंची संख्या केवळ ४२२ इतकीच राहीली. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याच कारणास्तव तायवानने बेसबॉल लीग सुरूच ठेवली. जगातील जुन्या निवडक व्यावसायिक लीगमध्ये या स्पर्धेचा समावेश होतो. काल राकुटेन मोंकिज आणि झुबोन गार्डियन्स हे दोन संघ रिकाम्या स्टेडियममध्ये कुठल्यातरी कारणावरून परस्परांमध्ये भिडले. झुबोनचा पिचर हेन्री याने कुओचा खेळाडू येन वेन याच्या कोथ्यावर ठोसा मारताच हा वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांविरुद्ध हाणामारी करताना दिसले. चाहत्यांनी हा ‘राडा’ टीव्हीवर पाहिला. खेळापेक्षा खेळाडूंमधील भांडणामुळे हा सामना अविस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया अनेक टीव्ही प्रेक्षकांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)